Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मुंबईने भाकरी फिरवली! MI ने असं काय केलं की 15 दिवसात Points Table मध्ये 7 टीम्सला टाकलं मागे

IPL 2025 Points Table Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या संघाने रविवारी मिळवलेला विजय हा त्यांचा स्पर्धेतील सहावा विजय ठरला.

मुंबईने भाकरी फिरवली! MI ने असं काय केलं की 15 दिवसात Points Table मध्ये 7 टीम्सला टाकलं मागे

IPL 2025 Points Table Update: इंडियन प्रिमिअर लीगमध्ये 15 दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ स्पर्धेमधून मागच्या वर्षीप्रमाणे लवकरच बाहेर पडतो की काय असं वाटत होतं. मुंबईचा संघ तळाच्या काही संघापैकी एक होता. मात्र अवघ्या दोन आठवड्यांमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाने भाकरी फिरवली म्हणावं त्याप्रमाणे थेट तिसरं स्थान पटकावलं आहे. खरं तर रविवारी लखनऊविरुद्धच्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर मुंबईचा संघ दुसऱ्या स्थानी पोहोचला होता. मात्र त्यानंतर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवत पहिलं स्थान पटकावल्याने मुंबईची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. मात्र 15 दिवसांमध्ये पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

12 एप्रिल रोजी नवव्या स्थानावर होती मुंबई

12 एप्रिल रोजी मुंबईचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी होता. पहिल्या पाच सामन्यांपैकी मुंबईला केवळ दोन विजय मिळवता आले होते. मुंबई मागील म्हणजेच 2024 च्या पर्वामध्येही पॉइण्ट्स टेबलच्या तळाशीच राहणार की काय अशी शंका चाहत्यांच्या मनातही निर्माण झाली होती. मात्र मागील पाच सामन्यांमध्ये मुंबईच्या संघासाठी दरवेळेस कोणी ना कोणी उभं राहत एकहाती सामना जिंकून देण्याचं काम केलं आणि त्यामुळेच मुंबईच्या संघाने पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. लखनऊविरुद्धचा विजय हा मुंबईचा सलग पाचवा विजय ठरला आहे. 54 धावांनी सामना जिंकल्याने मुंबईच्या नेट रनरेटमध्ये चांगली वाढ झाली असून त्यांनी थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईने मागील 15 दिवसांमध्ये असं केलं तरी काय ते पाहूयात...

मुंबईने कोणाकोणाला पराभूत केलं?

मुंबईने पाच सामन्यामध्ये सातत्याने विजय मिळवला असून त्यामुळे त्यांच्या नावावर एकूण सहा विजय झाले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला निराशाजनक कामगिरी केल्यानंतर त्यांनी दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद (दोनवेळा विजय), चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचे पाच सामने जिंकले. या प्रत्येक विजयामुळे मुंबईच्या संघाचा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यांनी स्पर्धेतील 46 सामन्यानंतर तिसरं स्थान पटकावलं आहे. प्लेऑफ्समध्ये अव्वल चार संघ पात्र ठरतात. 

फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही गवसली लय

मुंबई इंडियन्सच्या मदतीसाठी या पाच सामन्यांमध्ये वेगवेगळे खेळाडू धावून आले. मात्र सूर्यकुमार यादव या सर्वच सामन्यामध्ये त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण खेळी करत राहिला. त्याने लखनऊविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावत ऑरेंज कॅप मिळवली. दुसरीकडे जसप्रीत बुमराहलाही लय गवसली असून त्याने लखनऊविरुद्धच्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या. 

इतर संघांच्या सुमार कामगिरीचा हातभार

त्यातल्या त्या रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या यांच्या समाधानकारक कामगिरीचाही संघाला फायदा झाला आहे. या शिवाय पॉइण्ट्स टेबलमध्ये वरच्या स्थानी असलेल्या काही संघांनी मागील काही सामन्यांमध्ये सुमार कामगिरी केल्याने मुंबईला अगदी झटपट तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेण्यास फायदा झाल्याचं दिसून आलं आहे. पॉइण्ट्स टेबलची सध्याची म्हणजेच बंगळुरु विरुद्ध दिल्ली या 46 व्या सामन्यानंतरची पॉइण्ट्स टेबलची स्थिती पाहूयात...

fallbacks

मुंबईचा पुढचा सामना कधी?

मुंबईचा पुढील सामना हा एक मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळवला जाणार आहे. राजस्थानचा संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे.

Read More