IPL 2025 Why PBKS Skipper Shreyas Iyer Missed Out Century: पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच आपल्या नवीन संघाकडून खेळताना आयपीएल 2025 च्या पर्वाला विजयासहीत सुरुवात केली. मंगळवारी झालेल्या सामन्यामध्ये श्रेयसने कॅप्टन्स नॉक म्हणजेच कर्णधाराला शोभेल अशी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. श्रेयसने 42 बॉलमध्ये नबाद 97 धावा केल्या. सामनाच्या शेवटकडे असताना श्रेयसचा संघ सहकारी शशांक सिंहने केलेल्या दमदार फटकेबाजीमुळे श्रेयस शतकापासून तीन धावा दूर राहिला. मात्र एवढा उत्तम खेळलेल्या श्रेयसला शशांकने शतक पूर्ण करु द्यायला मदत करायला हवी होती असं मत अनेक चाहत्यांनी नोंदवलं आहे. असं असलं तरी शशांकने त्याच्या या निर्णायक पण चाहत्यांची नाराजी ओढावून घेणाऱ्या खेळीसाठी स्वत: शतक हुकलेला श्रेयसच जबाबदार असल्याचा खुलासा केला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रेयसने दिलेल्या एका सल्ल्यामुळेच आपण तो 97 वर असतानाही फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिल्याचं शशांक म्हणाला आहे.
श्रेयस अय्यर आपल्या खेळीमध्ये 9 षटकार आणि 5 चौकार लगावले. मात्र सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजी करणाऱ्या शशांकने एक धाव काढून श्रेयसला फलंदाजी करायला देण्याऐवजी संघाच्या हिताला प्राधान्य दिलं. शशांकने 16 बॉलमध्ये 44 धावा केल्या. यापैकी 23 धावा त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये केला. शशांकने आपल्या खेळीदरम्यान सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. मात्र या तुफान खेळीमुळे कर्णधार श्रेयसला हातातोंडाशी आलेली आयपीएलमधील पहिलं शतक झळकावण्याची संधी हुकली. मात्र यावरुन शशांकवर टीका होऊ लागल्यानंतर आपली ही खेळी कर्णधार श्रेयसच्या सल्लानुसारच होती असं सांगितलं आहे. श्रेयसनेच आपल्याला डावाचा शेवट करण्याचा सल्ला मैदानात दिल्याचं शशांकने सांगितलं आहे. शशांकने शेवटच्या ओव्हरमध्ये एका चेंडूवर एक धाव काढत श्रेयसला एक बॉल तरी खेळू दिला पाहिजे होता. एका बॉलमध्ये चौकार लगावत श्रेयसने शतक झळकावलं असतं आणि तो 101 वर नाबाद राहिला असता, असं अनेक चाहत्यांनी म्हटलं. मात्र मैदानात नेमकं काय झालं हे शशांकने सांगितलं आहे.
"मला चांगली खेळी करता आली. श्रेयसने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती डगआऊटमध्ये बसून पाहताना फार छान वाटलं," असं शशांकने सामन्यानंतर म्हटलं. "मी फलंदाजीसाठी मैदानात गेलो तेव्हा मला श्रेयसने सर्व चेंडूंवर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न कर असं सांगितलं. शेवटच्या ओव्हरपर्यंत वाट न पाहता आताच मोठे फटके मारण्यास सुरुवात कर असं मला सांगण्यात आलं. मी सुद्धा चेंडू बघून मारत होतो आणि जास्तीत जास्त चौकार-षटकारांचा विचार करत होतो," असं शशांकने सांगितलंय. यामुळेच आपण शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी केल्याने श्रेयसला शतक पूर्ण करता आलं नाही असं शशांकला सूचित करायचं होतं. "पहिल्या चेंडूपासून श्रेयसने मला स्पष्टच सांगितलं होतं की, शशांक माझ्या शकताचा विचार करु नकोस. तू तुझ्या पद्धतीने फटकेबाजी कर," असंही शशांक म्हणाला.
पंजाबच्या संघाने 243 धावांचा डोंगर उभा करताना मोहम्मद सिराजने टाकलेल्या डावातील शेवटच्या ओव्हरमध्ये शशांकने एकट्याने 22 धावा केल्या. "मला संघाने आणि संघ व्यवस्थापनाने दिलेला पाठिंबा अशावेळी महत्त्वाचा ठरतो. मी मोकळेपणे माझ्या पद्धतीने फटकेबाजी करत होतो. माझ्या जमेच्या बाजू लक्षात घेत मी फटकेबाजी करत होतो," असं शशांक म्हणाला.