IPL 2025: मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) आयपीएलच्या इतिहासातील रिटायर्ड आऊट होणारा चौथा फलंदाज ठरला आहे. अखेरच्या षटकांमध्ये स्फोटक फलंदाजीची अपेक्षा असताना तिलक वर्माने (Tilak Varma) फक्त दोन चौकार लगावत 23 चेंडूत 25 धावा केल्या. यानंतर मिशेल सँटरला मैदानात आणण्यासाठी कर्णधार हार्दिंक पांड्याने (Hardik Pandya) तिलक वर्माला माघारी धाडलं. यावेळी संघाला 7 चेंडूत 24 धावांची गरज होती. तिलक वर्माने काही केल्या चेंडू सीमेपार जात नव्हता. यामुळेच त्याचा चालू सामन्यादरम्यान मैदान सोडावं लागलं. तिलक वर्मासह त्यावेळी मैदानात कर्णधार हार्दिक पांड्या खेळत होता. मुंबईने हा सामना 12 धावांनी गमावला. दरम्यान या निर्णयावर हार्दिक पांड्याने भाष्य केलं आहे.
मुंबई इंडियन्स संघाने चारपैकी तीन सामने गमावले आहेत. संघाच्या लखनऊविरोधातील पराभवामागे फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीदेखील कारणीभूत ठरला. त्याने चार षटकांमध्ये 21 धावा दिल्या. तसंच नमन धीरची विकेट घेतली.
"मला वाटतं एक फलंदाजांची फळी म्हणून आम्ही कमी पडलो. आम्ही संघ म्हणून जिंकतो आणि संघ म्हणूनच पराभूत होतो. मला कोणाकडेही बोट दाखवायचं नाही. याची जबाबदारी सर्व फलंदाजांनी घ्यायची आहे. मी याची पूर्ण जबाबदारी घेतो," असं मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला.
"जेव्हा तुमचा पराभव होतो तेव्हा ते फार निराशाजनक असतं. खरं सांगायचं झालं तर आम्ही मैदानात 10 ते 15 अतिरिक्त धावा दिल्या," अशी कबुलीही हार्दिक पांड्याने दिली.
हार्दिक पांड्याने या सामन्यात प्रथमच पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली. मात्र असं असतानाही त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता संघाने योग्य निर्णय घेण्याची तसंच गोलंदाजी हुशार पद्धतीने कऱण्याची आणि फलंदाजी करताना जोखीम उचलण्याची गरज आहे असं त्याने म्हटलं आहे.
"मी नेहमीच गोलंदाजीचा आनंद घेतला आहे. मला वाटत नाही माझ्याकडे फार पर्याय आहेत. मी विकेट समजण्याचा प्रयत्न करतो आणि काही हुशार पर्याय अवलंबतो. मी विकेटसाठी जाण्याचा प्रयत्न करत नाही. मी धावा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करतो आणि त्यादरम्यान फलंदाज जोखीम उचलतात," असं हार्दिक म्हणाला.
"मला इतकंच सांगायचं आहे की, फक्त चांगलं क्रिकेट खेळा. चांगले निर्णय घ्या. गोलंदाजी हुशार पद्धतीने करा. फलंदाजी करताना जोखीम उचला. साधं क्रिकेट आक्रमकतेने खेळा. ही फार मोठी स्पर्धा असल्याने काही विजय आपल्याला पुन्हा सूर गवसण्यात मदत करतील," असं हार्दिक पांड्या म्हणाला आहे.