Much Mukesh Ambani Earn Via IPL: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 18 व्या पर्वाचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी पार पडला. या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जचा संघ आमनेसामने होता. अपेक्षेप्रमाणे या सामन्यावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. या वर्षी अंतिम सामना 64 कोटी 30 लाख प्रेक्षकांनी पाहिला. 22 मार्च रोजी सुरू झालेल्या आयपीएलच्या 2025 च्या पर्वातील सामन्यांच्या प्रसरणाचे हक्क जिओ हॉटस्टारकडे होते. 'हॉटस्टार' आणि 'जिओ सिनेमा'च्या विलीनीकरणानंतरचं हे पहिलं आयपीएल ठरलं. या विलीनीकरणानंतर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा 'हॉटस्टार'मध्ये 63.16 टक्के वाटा आहे.
बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलमधून बक्कळ पैसा कमावला आहे. या स्पर्धेआधी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की, आयपीएल 2025 मध्ये टेलिव्हिजन, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि टीम स्पॉन्सर म्हणून दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून 6 हजार कोटी ते 7 हजार कोटी रुपयांचा नफा अपेक्षित आहे.
यावर्षी आयपीएलदरम्यान, 'जिओस्टार'ने जाहिरातींमधून 6,000 कोटी रुपयांची मोठी कमाई करण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते. 'इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, कंपनीने आयपीएल 2025 मध्ये 4500 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले होते. गेल्या वर्षी टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या 4000 कोटी रुपयांपेक्षा यंदा मोठं टार्गेट ठेवण्यात आलं होतं.
लोक आयपीएलसारख्या नामांकित स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी 'जिओस्टार'चं सबस्क्रिप्शन खरेदी करतील, असं ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे कंपनीला याचा थेट फायदा होईल कारण कंपनी सबस्क्रिप्शन प्लॅनमधून उत्तम कमाई करते. याशिवाय, कंपनी सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करते. साधारणपणे, आयपीएल सामन्यादरम्यान दहा सेकंदांच्या जाहिरातीसाठी 18 ते 19 लाख रुपये आकारले जातात. मात्र, यावेळी जाहिरातीच्या दरांमध्ये 20 ते 30 टक्के वाढ झाल्याचा उल्लेखही अनेक बातम्यांमध्ये होता.
कंपन्या स्वतःचा प्रचार करण्यासाठी अशा मोठ्या स्पर्धांमधून जाहिरातींचा वापर करतात. 'जिओस्टार'सारखे प्रसारक त्यासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम आकारतात. यावर्षीच्या सामन्यात मुकेश अंबानींना किती नफा झाला याबद्दल सध्या कोणतीही ठोस माहिती नाही, परंतु अंतिम सामन्याबद्दल लोकांमध्ये असलेली क्रेझ पाहून असे म्हणता येईल की अंबानींनी यंदाच्या आयपीएल पर्वात खूप पैसे कमावले.