IPL 2025: 2 वर्षांच्या विश्रांतीनंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये परतलेल्या करुण नायरने दिल्ली कॅपिटल्ससाठी एक शानदार खेळी करून टी-20 मध्ये पुनरागमन केलं आहे. पण मागील दोन हंगामात संघांपासून दूर असतानाही त्याला नेहमीच गुणवत्तेच्या बाबतीत असणाऱ्या अपेक्षांची कल्पना होती. हंगामातील आपल्या पहिल्या संधीचं सोनं करत करुणने 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 40 चेंडूत 89 धावा केल्या. पण दिल्ली संघ 193 धावांवर सर्वबाद झाल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली. दिल्लीचा मुंबई इंडियन्सविरुद्ध 12 धावांनी पराभव झाला. जगातील फार कमी फलंदाजांना बुमराहला एकाच ओव्हरमध्ये 2 षटकार लगावण्याची किमया साधता आली आहे. स्थानिक हंगामात विदर्भासाठी 1870 धावा करणं यशाची गुरुकिल्ली असल्याचं त्याने सांगितलं.
करुण नायरला त्याच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आलं असता त्याने जबरदस्त उत्तर दिलं. संघाचा पराभव झाला असल्याने आता त्यावर बोलण्यात फार अर्थ नाही असं त्याने म्हटलं. "त्याबद्दल बोलण्यामध्ये आता काहीच फायदा नाही. मी चांगला खेळलो, पण संघाचा पराभव झाला. त्यामुळे त्यावर बोलण्यास काही अर्थ नाही. जर माझा संघ जिंकू शकत नसेल तर अशा खेळीची किंमत नाही," असं करुण नायर म्हणाला.
"खरं सांगायचं तर, मी आधीही आयपीएल खेळलो असल्याने माझ्यात आत्मविश्वास होता. ते कसं असेल याची मला कल्पना होती. मी ज्याचा कशाचा सामना करणार आहे ते काही नवीन नाही," असं करुण नायरने पत्रकारांना सांगितलं.
"तर माझ्या मनात तिथे जाऊन स्वतःला काही चेंडू खेळण्यास देणं यासह खेळाची गती आणि वातावरणाची पुन्हा सवय करून घेण्याबद्दल होतं," असं नायर म्हणाला. करुण नायर आपला अखेरचा हंगाम 2022 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळला होता.
"मी स्वतःला सांगितलं की, स्वतःला वेळ दे, सामान्य शॉट्स खेळ आणि नंतर गरज पडल्यास सुधारणा कर'. सुदैवाने, सर्वकाही यशस्वी झाले आणि मी चांगली फलंदाजी केली याचा मला आनंद आहे. पण पुन्हा एकदा, जर संघ जिंकला असता तर मला ते आवडले असते," अशी भावना करुण नायरने व्यक्त केली.
"अर्थातच, आम्ही फाफसारखा एक महत्त्वाचा खेळाडू गमावला आहे. पण आमच्यापैकी काही फलंदाज जे बाहेर बसले आहेत त्यांना आपल्याला कोणत्याही क्षणी खेळावं लागू शकतं याती कल्पना होती. म्हणून, मानसिकदृष्ट्या, मी तयार होतो, आणि अर्थातच संधी आल्यावर उत्सुकतेने वाट पाहत होतो, मला आत्मविश्वास वाटत होता. त्यामुळेच संधी मिळाल्यास मी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे तयार होतो. त्यामुळेच मी संपूर्ण हंगामात मी अशा पद्धतीने तयारी केली होती आणि संधीची वाट पाहत होतो. म्हणून मी खेळासाठी तयारी करण्यासाठी आणि तयार राहण्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न करत होतो." असं करुणने सांगितलं.
"संघाला 11 ते 12 खेळाडूंची निवड करणं नेहमीच कठीण जातं. मी नेहमीच याचा आदर केला आहे. माझ्यासाठी तयारी करणं आणि त्या प्रक्रियेला फॉलो करणं होतं जे माझ्यासाठी योग्य ठरलं. तिथे जाऊन चांगली कामगिरी करणं हेच माझं लक्ष्य आहे," असं त्याने म्हटलं.