Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'अशा पद्धतीने फलंदाजी करत...'; धोनीने निवृत्त व्हावं का? प्रश्नावर जाफर सर्वांच्या मनातलंच बोलला

IPL 2025 Dhoni CSK playing XI: धोनीला पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आलं असून घरच्या मैदानावर हा सीएसकेचा सलग दुसरा पराभव ठरला आहे.

'अशा पद्धतीने फलंदाजी करत...'; धोनीने निवृत्त व्हावं का? प्रश्नावर जाफर सर्वांच्या मनातलंच बोलला

IPL 2025 Dhoni CSK playing XI: चेन्नई सुपर किंग्जच्या संघांमध्ये महेंद्रसिंह धोनीला अंतिम 11 खेळाडूंमध्ये कायम ठेवावं की नाही हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा धोनीला मौक्याच्या क्षणी चमकदार कामगिरी करुन संघाला विजय मिळवून देता आला नाही. धोनीनं ऐनवेळी कच खाल्ली आणि चेन्नईने घरच्या मैदानावर सामना गमावला. धोनीने 184 धावांचा पाठलाग करताना नाबाद 30 धावा केल्या मात्र चेन्नईचा 25 धावांनी पराभव झाला. चेन्नईमधील एम. ए. चिदम्बरम स्टेडिमवरील मैदानातील सलग दुसरा पराभव ठरला आहे.

धोनीला खेळ उंचावता आला नाही 

दिल्ली विरूद्धच्या सामन्यात धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यावेळेस चेन्नईची अवस्था 74 वर पाच बाद अशी होती. संघाला विजयासाठी 56 चेंडूंमध्ये 110 धावांची गरज होती. म्हणजेच जवळपास 12 धावांच्या सरासरीने फलंदाजी करणं अपेक्षित होतं. आपलं दुसरं अर्धशतक झळकावणाऱ्या विजय शंकरने 84 धावांची खेळी केली. मात्र त्यानंतरही संघाला पराभावाचं तोंड पहावं लागलं. चेन्नईच्या या पराभवानंतर धोनीवर पुन्हा टीका होताना दिसत आहे. अनेकांनी धोनीने आता निवृत्त व्हावं असा सल्ला दिला आहे. 

निवृत्त व्हावं का? जाफर स्पष्टच बोलला

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आपल्या मिम्समुळे, खोचक सल्ल्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या वसीम जाफरला 'ईएसपीएन क्रिकेइन्फो'च्या शोमध्ये धोनीने निवृत्त होऊन आता संघातील अंतिम 11 खेळाडूंमध्ये तरुणांना संधी देण्याची गरज आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर जाफरने, "होय, तो जर कर्णधार नसेल आणि अशापद्धतीने फलंदाजी करत असेल तर त्याला अशा अवस्थेत पाहणं वेदनादायी आहे," असं स्पष्ट मत व्यक्त केलं. हे जाफरचं विधान अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनातलं असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

निवृत्तीच्या घोषणेची चाहूल?

धोनीचे वडील पान सिंह आणि आई देविका देवी हे दोघेही दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नईच्या मैदानावर उपस्थित होते. त्यामुळे धोनी या सामन्यानंतर निवृत्त होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र चेन्नईचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने या गोष्टी अफवा असल्याचं स्पष्ट करत निवृत्तीचं वृत्त फेटाळलं. "तो काय करणार आहे याची मला कल्पना नाही. मी केवळ त्याच्यासोबत काम करण्याच आनंद घेतोय. मी हल्ली याबद्दल विचारतही नाही. तुम्हीच याबद्दल विचारत असता," असं फ्लेमिंग सामना संपल्यानंतर म्हणाला.

धोनी थकला

धोनीला मागील काही सामन्यामध्ये ऐन क्षणी कामगिरी उंचावता आलेली नाही. मोठे फटके मारण्याचे त्याचे प्रयत्न यशस्वी होत नसून चाहत्यांचा पाठिंबा असला तरी वय आणि शरीर त्याला साथ देत नसल्याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. धोनी थकला असून त्याने निवृत्ती घ्यावी अशी मागणी आता दबक्या आवाजात अनेक आजी-माजी क्रिकेटपटू करत आहेत.

 

 

 

Read More