IPL 2025 Mumbai Indians Player PCB Notice: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वाला अवघ्या दोन दिवसांमध्ये सुरुवात होत असतानाच मुंबई इंडियन्सच्या संघातील एका खेळाडूला चक्क पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने नोटीस पाठवली आहे. पाकिस्तानी प्रिमिअर लीगच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका या खेळाडूवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता हा खेळाडू या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या देशांपैकी कोणत्या देशातील टी-20 लीग खेळायची या गोंधळात अडकून पडला आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळणाऱ्या ज्या खेळाडूला पीसीबीने नोटीस पाठवली आहे त्याचं नाव आहे, कॉर्बिन बॉश! कॉर्बिन हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आहे. कॉर्बिनने आधी पाकिस्तान क्रिकेट लीगमधील पेशावर झलमीच्या संघाबरोबर करार केला होता. त्याने 13 जानेवारी 2025 रोजी डायमंड कॅटेगरीअंतर्गत पीएसएलच्या या संघासोबत दहाव्या पर्वात खेळण्यासाठी करार केलेला. मात्र आता मुंबई इंडियन्सच्या संघाने कॉर्बिनला लिझॅड विल्यम्सच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून जाहीर केलं आहे. विल्यम्सला दुखापत झाल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याने कॉर्बिनला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
मुंबई इंडियन्ससारख्या मोठ्या संघाकडून बोलावणं आल्याने कॉर्बिनने पीएसएलमध्ये खेळण्याऐवजी मुंबईकडून आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. पीएसएलचे सामने सुद्धा आयपीएलप्रमाणेच एप्रिल आणि मे महिन्यात खेळवले जाणार आहेत. आयपीएल 22 मार्च ते 25 मे दरम्यान खेळवलं जाणार असून या दोन्ही स्पर्धा एकाच वेळी पार पडणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही स्पर्धांमध्ये खेळणं कोणत्याच खेळाडूला शक्य होणार नाहीये.
पीसीबीने या प्रकरणासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये कॉर्बिनला त्याच्या एजंटच्या माध्यमातून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कॉन्ट्रॅक्टमधील अटींना छेद देत माघार का घेतली याबद्दलचा जाब या नोटीसमधून विचारण्यात आला आहे. मुंबईचा संघ 23 मार्चला यंदाच्या पर्वातील आपला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. यापूर्वी कॉर्बिन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाचा भाग होता. मात्र तो राखीव खेळाडू असल्याने त्याला प्रत्यक्षात संघात स्थान मिळालेलं नव्हतं. त्यामुळे त्याचं आयपीएलमधील पदार्पण अजून बाकी आहे.
दक्षिण आफ्रिकेतील एसए20 या स्पर्धेच्या नुकत्याच पार पडलेल्या पर्वात कॉर्बिन मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या एमआय केप टाऊन संघाकडून खेळला होता. या संघाकडून खेळताना 30 वर्षीय कॉर्बिनने सात सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या. या संघाला 2024-25 ची एसए20 चा चषक जिंकवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
कॉर्बिन दक्षिण आफ्रिकेसाठी केवळ एक कसोटी सामना आणि दोन एकदिवसीय सामना खेळला आहे. तो 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात होता. मात्र प्रत्यक्षात तो एकही सामना खेळला नाही. तो आतापर्यंत 86 टी-20 खेळला असून त्याने एकूण 59 विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजी करताना कॉर्बिनने दोन अर्धशतकांसहीत एकूण 663 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो आता मुंबईच्या संघातून कसा खेळतो याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.