Tilak Varma Retired Out: लखनऊविरोधातील सामन्यात तिलक वर्माला रिटायर्ड आऊट केल्याने मुंबई संघाला क्रिकेट चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. हा निर्णय घेतल्याने कर्णधार हार्दिक पांड्याला लक्ष्य केलं जात आहे. मात्र या निर्णयामागे हार्दिक पांड्या नव्हे तर मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धेने असल्याचं उघड झालं आहे. अखेरच्या षटकामध्ये सामना अटीतटीचा असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचं त्याने सांगितलं आहे. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरलेल्या तिलक वर्माने 23 चेंडूत फक्त 25 धावा केल्या. तिलक वर्मा मैदानात मोठे फटके खेळण्यात अपयशी ठरत होता आणि यामुळेच त्याला माघारी बोलावण्यात आलं. महेला जयवर्धेनेने या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. आपल्याला डेथ ओव्हर्समध्ये नवा खेळाडू हवा होता असं त्याने सांगितलं आहे.
"तिलकने आमच्यासाठी चांगली फलंदाजी केली. जेव्हा आम्ही तिसरी विकेट गमावली तेव्हा त्याने सूर्यासोबत भागीदारी केली. त्याला खेळण्याची इच्छा होती पण तो ते करू शकला नाही आणि शेवटच्या काही षटकांपर्यंत वाट पाहत राहिला. तुम्ही थोडा वेळ घालवला असल्याने तुम्हाला तो फटका मारता आला असता. पण मला वाटलं की शेवटी, जेव्हा तो संघर्ष करत होता तेव्हा मला फक्त एका नवीन खेळाडूची गरज होती. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात आणि त्याला बाहेर काढणं चांगले नव्हते, पण मला ते करावे लागले. त्यावेळी तो एक धोरणात्मक निर्णय होता," असं जयवर्धनेने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
हार्दिक पांड्याने या सामन्यात प्रथमच पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच आयपीएल कर्णधार ठरला. मात्र असं असतानाही फलंदाजीच्या माध्यमातून तो सामना राखू शकला नाही.
"त्याच्याकडे असलेल्या अनुभवामुळे, त्याला हे जाणवले की हे [स्लो आणि बॅक ऑफ लेन्थ बॉलिंग] त्याला करावे लागेल कारण आम्ही पॉवरप्लेमध्ये खूप धावा लीक केल्या होत्या. आम्हाला फक्त थोडा वेग कमी करायचा होता, जो आम्हाला पॉवरप्लेमध्येही करायला हवा होता. मला वाटतं म्हणूनच हे खेळाडू अनुभवी आहेत. ते परिस्थितीशी चांगले जुळवून घेतात, संधी काय आहेत ते पाहतात. त्याने निश्चितच गोलंदीजीतू आमच्यासाठी सामना परत आणला आणि आम्हाला या धावसंख्येचा पाठलाग करण्याची चांगली संधी दिली," असं जयवर्धने पुढे म्हणाला.