आयपीएल 2025 चा हंगाम सुरु झाला तेव्हा रोहित शर्माच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघत नव्हत्या. पण जसजशी आयपीएल स्पर्धा पुढे सरकत आहे तसतसा रोहित शर्मा फॉर्मात येत असून, धावा कुटत आहे. रोहित शर्माने 10 सामन्यांमध्ये 293 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र तुफान फलंदाजी कऱणारा रोहित शर्मा मैदानात क्षेत्ररक्षण करताना दिसत नाही. त्याचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जास्त वापर होताना दिसतो. मुंबई इंडियन्स आता पुढील सामना गुजरातसोबत खेळणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने (Mahela Jayawardene) रोहित शर्माला (Rohit Sharma) इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जास्त का खेळवलं जात आहे याचा खुलासा केला आहे.
आयपीएल 2025 च्या हंगामात बहुतेक वेळा रोहित शर्मा क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही. फक्त 2 ते 3 ओव्हर तो क्षेत्ररक्षण करताना दिसतो. मात्र फलंदाजीला तो आघाडीला खेळण्यासाठी उतरतो. सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत महेला जयवर्धने याने रोहित शर्माला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळवण्याचा निर्णय हंगामाच्या सुरुवातीला घेण्यात आला नव्हता असं स्पष्ट केलं. तसंच भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार एका अडचणीत सापडला होता; म्हणूनच त्याचा वापर इम्पॅक्ट सब म्हणून करण्याचा निर्णय घेण्यात आला असंही त्याने स्पष्ट केलं.
"नाही हे सुरुवातील असं नव्हतं. नक्कीच रोहित काही सामन्यात क्षेत्ररक्षण करत होता. पण जर तुम्ही संघाची बांधणी पाहिलीत तर अनेक खेळाडू दुहेरी भूमिका निभावत आहेत. यापैकी अनेकजण गोलंदाजी करत आहेत. त्याचवेळी काही मैदानात वेगवान खेळाडूंची गरज असते," असं महेला जयवर्धनेने सांगितलं.
"तुम्हाला वेगवान खेळाडूंची गरज असते. त्यामुळे खेळात तेदेखील महत्त्वाचं असतं. दुसरीकडे रोहित शर्माही चॅम्पिअन्स ट्रॉफीतील दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे त्याच्यावर जास्त दबाव आणू नये अशी आमचा प्रयत्न आहे. फलंदाजी महत्त्वाची असल्याने आम्ही ते करण्यात यशस्वी झालो आहेत," असं महेला जयवर्धनेने सांगितलं.
रोहितला इम्पॅक्ट सब म्हणून खेळवणं हा कोणताही अडथळा नाही, कारण तो डगआउटमधून आपलं मत देत राहतो आणि खेळाभोवतीच्या चर्चेत सतत सहभागी असतो असंही त्याने सांगितलं. "मैदानात किंवा मैदानाबाहेर असतानाही तो त्याचं योगदान देत राहतो. सतत संवाद होत असतो. सक्रीयपणे त्याचा सहभाग असतो," असं तो म्हणाला.
"पण सामन्यात आवश्यक असलेले सर्व गोलंदाजी पर्याय आमच्याकडे आहेत याची खात्री करण्यासाठी एकंदर नियोजन करणं पुरेसे आहे. आणि आमच्याकडे बरेच वरिष्ठ खेळाडू देखील आहेत. त्यांना बाहेर काढलं जाण्याची शक्यता जास्त असते (एकतर सूर्या किंवा तिलक किंवा असाच कोणीतरी, डोमेस्टिक फलंदाज). त्यामुळे माझ्यासाठी हा एक कठीण पर्याय आहे. पण तो असणे ही डोकेदुखी चांगली आहे," असं तो पुढे म्हणाला.
मुंबई इंडियन्स सध्या 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर मंगळवारी त्यांनी गुजरातचा पराभव केला तर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जातील.