IPL 2025: दिल्लीविरोधातील सामन्यात महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. दिल्लीने दिलेल्या 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनी नाबाद राहिला. मात्र सामन्याचा निकाल चेन्नई संघाला अपेक्षित नव्हता. एकेकाळी आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या चेन्नई संघाने कोणताही संघर्ष न करता तिसऱ्या पराभवाची नोंद केली. चेन्नई संघाची फलंदाजी यानिमित्ताने चिंतेचा विषय ठरत आहे. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांकडून अपेक्षा होती. मात्र विजय शंकर (54 चेंडूत नाबाद 69) आणि धोनी (26 चेंडूत नाबाद 30) संघाला विजयाच्या समीपही नेऊ शकले नाहीत.
धावांचा पाठलाग करताना वेगवान खेळीची गरज असतानाही विजय शंकर आणि धोनी यांनी संथगतीने फलंदाजी केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. एका क्षणी तर धोनी फ्री हिटवरही मोठा फटका खेळू शकला नाही. भारतीय संघाचे माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यावेळी समालोचन करत होते. धोनी षटकार मारेल असा अंदाज सिद्धू यांना वर्तवला होता. 'जर त्याने आता शॉट खेळला नाही, तर मग कधी?', असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. त्या क्षणी चेन्नईला 40 चेंडूत 94 धावांची गरज होती. पण धोनी मोठा शॉट खेळू शकला नाही आणि चेंडू त्याच्याकडून सुटला. यानंतर सिद्धू चिडले आणि म्हणाले 'ले भैय्या, हा तर फुसका बार निघाला'.
चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) विरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, सलग तीन सामने इतक्या सहज जिंकण्याची अपेक्षा नव्हती. मात्र , त्यांच्या संघाने अद्याप परिपूर्ण सामना खेळलेला नाही.
अक्षरच्या नेतृत्वाखालील दिल्लीने आयपीएल 2025 मध्ये आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. 2009 नंतर पहिल्यांदाच त्यांनी तीन विजयांसह हंगामाची सुरुवात केली. केएल राहुलच्या मॅचविनिंग 77 धावा आणि विप्रज निगम आणि कुलदीप यादवच्या फिरकी गोलंदाजीमुळे त्यांनी चेन्नईवर 24 धावांनी विजय मिळवला.
सामन्यानंतर अक्षर म्हणाला, "मला हे सोपे वाटत नव्हतं (तीन सामने सलग जिंकणं). सर्वांनी योगदान दिले, संघाचे संतुलन चांगलं दिसत आहे. कर्णधार म्हणून तीन पैकी तीन सामने जिंकणं चांगलं वाटतं. मी आज स्वतःला जपत होतो (जास्त गोलंदाजी न करत) आणि माझ्या बोटाला दुखापत देखील झाली आहे. प्रत्येक सामन्यात काही उत्तम झेल आणि काही ड्रॉप्स देखील होतात. कर्णधार म्हणून, मला वाटत नाही की आम्ही अद्याप एक परिपूर्ण सामना खेळलो आहोत. आयपीएल ही एक मोठी स्पर्धा आहे, गती कधीही बदलू शकते."
दिल्लीने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जेक फ्रेझर मॅकगर्कला लवकर गमावल्यानंतर, केएल राहुल आणि अभिषेक पोरेल (20 चेंडूत 33 , चार चौकार आणि एक षटकार) यांच्यात 54 धावांची भागीदारी आणि केएलने समीर रिझवी (15 चेंडूत 20, एक चौकार आणि षटकार) यांच्यात 56 धावांची भागीदारी यामुळे दिल्लीची धावगती चांगली राहिली. केएलने दिल्लीकडून खेळताना पहिलं अर्धशतक झळकावलं. त्याने 51 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 77 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने (12 चेंडूत 24*, दोन चौकार आणि एका षटकारासह) शेवटच्या ओव्हर्समध्ये जबरदस्त खेळ केला आणि संघाला 20 षटकांत 6 बाद 183 अशी मजल मारण्यास मदत केली.
धावांचा पाठलाग करताना चेन्नई संघ पहिल्यापासूनच आव्हानात्मक दिसत नव्हता. त्यांनी 74 धावांत पाच विकेट गमावल्या. विजय शंकर (54 चेंडूत 69*, पाच चौकार आणि एका षटकारासह) आणि एमएस धोनी (26 चेंडूत 30*, एक चौकार आणि षटकारासह) यांनी त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण अखेर 24 धावांनी त्यांनी सामना गमावला.