IPL 2025 Ajinkya Rahane On PBKS Win Against KKR: कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मंगळवारी पंजाब किंग्जविरुद्धचा सामना सहज जिंकून पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान होण्याची आयती संधी गमावली. पंजाबच्या संघाला अवघ्या 111 धावांवर बाद केल्यानंतर हा सामना कोलकाता आता सहज जिंकणार असं वाटतं असतानाच कोलकात्याची बॅटींग ऑर्डर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याने संघाला 95 धावांपर्यंतच मजल मारला आली आणि सामना पंजाबने 16 धावांनी जिंकला. हा पराभव कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे. रहाणेनं पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे, असं म्हटलंय.
सामन्यानंतर बोलताना अजिंक्य रहाणेच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. "स्पष्टीकरण देण्यासारखं काहीच नाहीये. आता जे झालं त्याबद्दल काय सांगायचं? जे काही झालं ते सर्वांनी पाहिलं आहे. या कामगिरीमुळे मी फारच निराश झालो आहे. या पराभवाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो. मी चुकीचा फटका खेळलो आणि बाद झालो," असं म्हणत अजिंक्य रहाणेनं नाराजी व्यक्त केली. तसेच बाद झाल्यानंतर रिव्ह्यू न घेतल्यावरुन प्रश्न विचारला असता अजिंक्यने, "मला त्यावेळेस रिव्ह्यू घेऊन कोणताही धोका पत्करायचा नव्हतो. म्हणून मी रिव्ह्यू घेतला नाही," असं सांगितलं. तसेच या सामन्यामुळे आता नेट रन रेटच्या जोरावर पंजाबच्या संघाने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तर कोलकात्याचं नेट रन रेट अधिक पडलं आहे. अजिंक्यनेही नेट रन रेटचा उल्लेख करत, "आम्ही नेट रन रेटचा विचार करु फलंदाजी करत नव्हतो," असं सांगितलं.
"आम्ही फारच वाईट फलंदाजी केली. आम्ही या पराभावची संपूर्ण जबाबदारी घेतो. सगळा दोष माझाच आहे. गोलंदाजांनी खेळपट्टीचा विचार करता फारच चांगली कामगिरी केली. पंजाबसारख्या संघाला त्यांनी 111 धावांवर रोखलं. आम्ही फारच स्वैर फलंदाजी केली. खरं तर धावसंख्या फार मोठी नव्हती आणि आम्ही ती सहज गाठायला हवी होती. सध्या माझ्या डोक्यात फार साऱ्या गोष्टींचा विचार सुरु आहे. मी वर ड्रेसिंग रुममध्ये जाईल तेव्हा खेळाडूंना काय सांगायचं याचा विचार करतोय. आम्हाला सकारात्मक राहायला हवं," असं अजिंक्य म्हणाला. तसेच शेवटी अजिंक्यने, आता म्हणाला हा सामना विसरुन पुढे गेलं पाहिजे, असंही म्हटलं.
नक्की पाहा >> दम लागेस्तोवर नाचल्यानंतर प्रिती झिंटानं मैदानात येऊन हसत 'या' क्रिकेटरला मिठीच मारली; Video चर्चेत
दुसरीकडे श्रेयस अय्यरने हा सामना जिंकल्यानंतर आम्ही फारच समाधानी आणि आनंदी आहोत, असं पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं. "खेळपट्टीवर चेंडू फारच वळत होता. ज्या पद्धतीने हा सामना झाला ते मला शब्दात मांडता येणार नाही. आमची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. खेळपट्टीवर चेंडू अचानक उसळी घेत होता. मला वाटलेलं की आम्ही 150 ते 160 पर्यंत पोहचू. मात्र तसं काही झालं नाही," असं श्रेयस म्हणाला.
या वेळेस बोलताना श्रेयसने गोलंदाजांना काय कानमंत्र दिलेला ते ही सांगितलं. "मी गोलंदाजांना एवढच सांगितलं होतं की विकेट्सच्या लाईनमध्येच गोलंदाजी करा. चहल गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला खेळ/ पट्टी साथ देत होती आणि त्याचा चेंडू चांगला वळत होता, असंही श्रेयस म्हणाला. अनेक गोष्टी आमच्या बाजूने घडत गेल्या," असं श्रेयसने हसत हसत सांगितलं आणि विजयाबद्दल समाधान व्यक्त केलं.