MI vs RCB Final On The Card: पंजाब किंग्जच्या संघाने मुंबई इंडियन्सविरुद्धचा सोमवारी झालेला सामना सात विकेट्सने जिंकला. जयपूरच्या मैदानात झालेल्या या सामन्यातील विजयामुळे पंजाबच्या संघाने आता पॉइण्ट्स टेबलमध्ये (IPL 2025 Points Table) अव्वल दोन संघांमध्ये स्थान निश्चित केलं आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेलं 185 धावांचं आवाहन पंजाबच्या संघाने 9 चेंडू शिल्लक असतानाच गाठलं. या विजयासहीत 19 पॉइण्ट्ससहीत पंजाबचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. पहिल्या स्थानी गुजरातचा संघ असून त्यांनी 14 सामन्यांमध्ये 9 विजयासहीत 18 पॉइण्ट्स मिळवले आहेत. तर मुंबईचा संघ 14 सामन्यांमध्ये 16 पॉइण्ट्सहीत चौथ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आहे. आरसीबीने 13 सामन्यांमध्ये 17 पॉइण्टस मिळवले आहेत. मात्र हे सारं समिकरण आरसीबीचा संघ आज बदलू शकतो.
2014 नंतर पहिल्यांदाच पंजाबचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. आता पंजाबचा संघ मुल्लनपूर येथे पहिली क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी रवाना झाला आहे. हा सामना 29 मे रोजी होणार आहे. याच मैदानावर एलिमिनेटर सामना म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांचा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाणार आहे. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर कोणता संघ असणार आहे हे आजच्या सामन्यानंतर ठरणार आहे.
आज म्हणजेच मंगळवारी 27 मे रोजी आरसीबीचा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे. आजच्या सामन्यातील आरसीबीच्या कामगिरीवर ते तिसऱ्या स्थानी राहणार की दुसरं अथवा अगदी पहिलं स्थान पटकवणार हे ठरणार आहे. मोठ्या फरकाने आरसीबीने लखनऊला पराभूत केलं तर ते पहिल्या स्थानावर झेप घेईल. मुंबई आणि पंजाबच्या सामन्यानंतर पॉइण्ट्स टेबलमध्ये आता केवळ एकच उलथापालथ घडू शकते.
लखनऊचा संघ आधीच प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादप्रमाणेच मोठ्या विजयासहीत स्पर्धेचा शेवट करण्याचा मानस लखनऊचा असेल. त्यामुळेच आरसीबीला लीग स्टेजमधील या शेवटच्या सामन्यात सहज विजय मिळणार नाही इतकं निश्चित आहे. आजच्या सामन्याकडेही क्रिकेट चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे. सध्याची पॉइण्ट्स टेबलची स्थिती कशी ते पाहूयात...
आरसीबीच्या संघाला आजच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही तर ते तिसऱ्या स्थानी कायम राहतील आणि एलिमिनेटरचा सामना आरसीबी आणि मुंबईमध्ये 30 मे रोजी होणार आहे. हा सामना मुल्लनपूरच्या मैदानात पार पडणार आहे. हा सामना करो या मरोचा असणार आहे.
आरसीबीचा संघ आजचा सामना जिंकून दुसऱ्या किंवा पहिल्या स्थानी गेला तर त्यांना पहिला क्वालिफायर सामना गुजरात जायंट्सच्या संघाविरुद्ध खेळावा लागेल. हा सामना जिंकल्यास आरसीबी थेट फायनलमध्ये पोहचले.
एलिमिनेटर सामन्यामध्ये पंजाबला पराभूत करुन मुंबई क्वालिफायर-2 साठी पात्र ठरल्यास त्यांचा सामना आरसीबीने पराभूत केलेल्या गुजरातच्या संघाविरुद्ध होईल. क्वालिफायर-2 जिंकल्यास मुंबईचा संघ अंतिम सामन्यात आरसीबीविरुद्ध मैदानात खेळताना दिसेल.
मात्र पहिल्या दोन संघांमध्ये येऊनही आरसीबीने पहिला क्वालिफायर गमावला तर त्यांना अजून एक संधी असेल. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील म्हणजेच पंजाब आणि मुंबईच्या संघापैकी एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाविरुद्ध आरसीबीच्या संघाला सामना खेळावा लागेल. या स्थितीमध्ये आरसीबी आणि मुंबईची गाठ क्वालिफायर-2 मध्ये पडू शकते.