IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा सीजन संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. गुरुवार 29 मे क्वालिफायर 1 सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्स चा पराभव करून थेट फायनलमध्ये धडक दिली. यासह आरसीबीने 2009, 2011 आणि 2016 नंतर पहिल्यांदाच फायनलमध्ये एंट्री केली आहे. अद्याप गेल्या 18 वर्षांमध्ये आरसीबीला एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. मात्र आता आरसीबीचा ट्रॉफी विजयाचा चांगला योग जुळून आला असून संघ सुद्धा चांगल्या फॉर्मात आहे. मागील अनेक वर्षांपासून आयपीएल विजयाची स्वप्न पाहणारे आरसीबीचे चाहते सुद्धा आता आपल्या आवडत्या संघाला ट्रॉफी उंचावताना पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. यादरम्यानच एका आरसीबी चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून यात त्याने लग्नाच्या मंडपात एक विचित्र अट घातली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यात आरसीबी चाहत्याने आपल्या लग्नमंडपात एक विचित्र अट सांगितली आहे, जी ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकदाही विजेतेपद पटकावलेलं नाही, असं असलं तरी त्यांची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. अनेकदा निराशा मिळाल्यावर सुद्धा चाहते संघाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात.
सध्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला, हा व्हिडीओ 3 आठवडे जुना असून 8 मे रोजी पोस्ट केलेला आहे. हा व्हिडीओ तेव्हा पोस्ट करण्यात आला जेव्हा आरसीबीने लीग स्टेजमध्ये स्थान पक्क केलं होतं. कोणालाच माहित नव्हतं की कोणता संघ फायनलमध्ये जाईल. तेव्हा आरसीबी चाहता त्याच्या लग्नात एक अट ठेवतो की जो पर्यंत आरसीबी आयपीएलची ट्रॉफी जिंकत नाही तो पर्यंत तो हनीमून साजरा करणार नाही.
या व्हिडीओमध्ये दोन्ही तरुण बोलताना म्हणतायत की, 'आम्ही दोघे आरसीबीचे खूप मोठे चाहते आहोत. आज माझ्या भावाचे लग्न आले आहे. माझ्या भावा, तुला आरसीबीविषयी काही म्हणायचं आहे का? असा प्रश्न केला. तेव्हा नवरदेव असणारा तरुण म्हणाला की, आरसीबी ट्रॉफी जिंकल्याशिवाय मी माझा हनीमून साजरा करणार नाही'. झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही की या या युवकाने खरोखरच लग्न केलंय की तो फक्त विनोद करतोय'. आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये क्वालिफाय झाल्यापासून चाहत्यांचे असे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. एका व्हिडीओमध्ये एका महिलेने स्टेडियममध्ये पोस्टर हाती घेत त्यावर लिहिले होते की, 'जर आरसीबी फायनल जिंकली नाही तर मी माझ्या पतीला घटस्फोट देईन' या महिलेचा व्हिडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
पंजाब किंग्सने प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात विजयासाठी 102 धावांचं दिलेलं टार्गेट आरसीबीने अवघ्या 10 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. अशी कामगिरी करणारा आरसीबी संघ आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ ठरला. यापूर्वी कोणत्याही संघाने प्लेऑफ सामन्यात जवळपास 10 ओव्हर्स शिल्लक ठेऊन विजय मिळवला नव्हता. त्यामुळे 10 ओव्हर्स शिल्लक असताना आयपीएल प्लेऑफमधील हा सर्वात मोठा विजय आहे.