Virat Kohli Broke Babar Azam Record: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यामध्ये प्रथम फंलदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 205 धावा केल्या. बंगळुरुकडून विराट कोहलीने 70 आणि देवदत्त पडिक्कलने 50 धावांचं योगदान दिलं. कोहलीने 42 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि दोन षटकार लगावले. कोहलीने आयपीएल 2025 मधील आपलं चौथं अर्धशतक झळकावलं. या खेळीबरोबरच विराटने टी-20 क्रिकेटमधील एका मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करताना पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि विद्यमान सलमीवीर बाबर आझमला मागे टाकलं आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यामध्ये बंगळुरुच्या संघातून विराटबरोबर इतरांनाही शक्य तितक्या धावांची भर घातली. यामध्ये फिल सॉल्टने केलेल्या 26 धावा, टिम टेव्हिडच्या 23 आणि जितेश शर्मा नाबाद 19 धावा यांचं योगदानही महत्त्वाचं ठरलं. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना विराटने अर्थशकत झळकावत पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याचा टी-20 क्रिकेटमधील विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेतला. विराटने टी-20 मध्ये 62 वं अर्थशतक झळकावलं आहे.
बाबर आझमने टी-20 मध्ये प्रथम फलंदाजी करताना एकूण 61 वेळा अर्थशतक झळकावलं आहे. तुफान फटकेबाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने टी-20 मध्ये अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम 57 वेळा केला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने टी-20 मध्ये 55 अर्धशतकं झळकावली आहेत. जॉस बटलरनेही 52 अर्धशतकं टी-20 मध्ये झळकावलीयेत. 52 वेळा अर्धशतक झळकावणाऱ्यांमध्ये फॅफ ड्युप्लेसीचाही समावेश आहे.
बंगळुरुच्या संघाने दिलेलं 206 धावांचं आव्हान राजस्थानच्या संघाला पेलवलं नाही. राजस्थानच्या संघाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 194 धावांपर्यंत मजल मारता आली. आयपीएलमधील हा 42 वा सामना बंगळुरुने 11 धावांनी जिंकला. हा बंगळुरुचा या स्पर्धेतील सहावा विजय ठरला आहे. बंगळुरुचा संघ या विजयासहीत थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. बंगळुरुच्या वर केवळ गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ असून त्यांनीही प्रत्येकी सहा विजय मिळवले आहेत. मुंबईचा संघ 5 विजयांसहीत चौथ्या स्थानी तर पंजाबच्या संघ पाच विजयांसहीत पाचव्या स्थानी आहे.
लखनऊचा संघ सहाव्या स्थानी असून त्यांनी 9 पैकी 5 सामने जिंकलेत. कोलकात्याच्या संघाला 8 पैकी 3 सामने जिंकता आल्याने हा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहेत. राजस्थानचा बंगळुरुविरुद्धचा पराभव हा सातवा पराभव ठरला आहे. राजस्थान आठव्या, सनरायझर्स हैदराबाद नवव्या आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानी आहे.