IPL 2025 Why RCB Wear Green Jersey Against Rajasthan Royals: इंडियन प्रिमिअर लीग 2025 मधील 27 व्या सामन्यामध्ये बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सवर मोठा विजय मिळवला. तब्बल 9 विकेट्स राखत बंगळुरुच्या संघाने मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे बंगळुरुचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. राजस्थानच्या घरच्या मैदानावर खेळताना राजस्थानने दिलेलं 174 धावांचा आव्हान बंगळुरुच्या संघाने अगदी सहज गाठलं. या सामन्यामध्ये लक्ष वेधून घेतलं हे बंगळुरुच्या संघाने परिधान केलेल्या हिरव्या रंगाच्या ड्रेसने. बंगळुरुच्या संघाचा ड्रेस खरा तर लाल रंगाचा आहे. मात्र या सामन्यात विराट कोहली आणि त्याचे सहकारी हिरव्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसले. मात्र बंगळुरुचा संघ मागील काही वर्षांपासून असा एखाद्या मॅचला हिरवा रंगाच्या कपड्यांमध्ये का खळतो? यासंदर्भातच जाणून घेऊयात...
पर्यावरणासंदर्भातील शाश्वततेबद्दल आरसीबीची वचनबद्धता दर्शवण्यासाठी रविवारी बंगळुरुचा संघ हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरला. मागील काही वर्षांपासून आरसीबीकडून 'गो ग्रीन' धोरणानुसार एका सामन्यात आवर्जून हिरव्या रंगाची कपडे परिधान करुन खेळाडू मैदानात उतरतात. या हिरव्या रंगाच्या कपड्यांच्या माध्यमातून आरसीबीच्या चाहत्यांनी झाडांचं संरक्षण करावं आणि अधिक अधिक झाडं लावावीत असा संदेश देण्याचा संघाचा प्रयत्न असतो.
या सामन्यामध्ये नाणेफेक आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार जिंकला. त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या वेळेस बोलताना त्याने हिरव्या रंगाच्या जर्सीचं महत्त्व सांगितलं. "आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करु. खेळपट्टी सपाट आणि मजबूत दिसत आहे. खेळपट्टी कशी राहते हे महत्त्वाचं असणार आहे. हे (हिरव्या रंगाचे) कपडे झाडांसंदर्भातील जागृतीसाठी आणि अधिक अधिक झाडं लावण्याचा संदेश देण्यासाठी आहे," असं रजत म्हणाला.
"आम्ही संघाच्या हरित धोरणानुसार आज वेगळ्या कपड्यांमध्ये सामना खेळत असून केवळ कपड्यांचा रंगच नाही तर हा सामनाही आमच्यासाठी फार खास आहे. हिरव्या रंगाची कपडे परिधान करुन खेळण हे फार उत्साहवर्धक आहे," असं रजत म्हणाला.
आरसीबीची ही हिरव्या रंगाची जर्सी प्युमा कंपनीच्या 'रि-फायबर' फॅबरीकने तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये 95 टक्के धागे हे रिसायकल केलेल्या पॉलिस्टरपासून तयार करण्यात आले आहेत. हे पॉलिस्टर निरुपयोगी प्लास्टीकपासून मिळवलेलं आहे. दर्जामध्ये कोणताही तडजोड न करता पुन:वापर करुन ही हिरवी जर्सी तयार करण्यात आली आहे.