RCB VS PBKS : आयपीएल 2025 चा क्वालिफायर 1 सामना गुरुवार 29 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Punjab Kings VS Royal Chellengers Bengluru) यांच्यात खेळवला गेला. महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे हा सामना पार पडला असून यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर 1 सामन्यात 8 विकेटने पंजाबवर विजय मिळवला. यासह त्यांनी थेट फायनलमध्ये धडक दिली आहे. आरसीबीने हा सामना अवघ्या 10 ओव्हर्समध्ये जिंकत आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.
महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या कर्णधारांमध्ये सामन्यापूर्वी टॉस झाला. हा टॉस आरसीबीने जिंकून गोलंदाजी निवडली तर पंजाबला प्रथमी फलंदाजीचे आव्हान दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सच्या एकही फलंदाजाला फारकाळ मैदानात टिकू दिले नाही. पंजाबकडून सर्वाधिक धावा प्रभसिमरन सिंह (18), मार्कस स्टोनिस (26) आणि अझमतुल्लाह उमरझाई (18) यांनी केल्या. तर उर्वरित फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या सुद्धा करता आली नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांपैकी पंजाबच्या सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट सुयश शर्मा आणि जॉश हेजलहूडने घेतल्या. यश दयालने 2 आणि भुवनेश्वर कुमार तसेच रोमॅरियो शेफर्डने प्रत्येकी 1 विकेट घेतली. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सला 14.1 ओव्हरमध्ये 101 धावांवर ऑल आउट केले. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी 102 धावांचे आव्हान मिळाले आहे.
हेही वाचा : पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटरचे कापण्यात आले दोन्ही पाय, कारण ऐकून धक्का बसेल
पंजाब किंग्सने आरसीबीला विजयासाठी 102 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान आरसीबीने 8 विकेट राखून पूर्ण करत सामना जिंकला. यात आरसीबीकडून फलंदाज फिलिप सॉल्टने 56, विराट कोहलीने 12, मयंक अग्रवालने 19, रजत पाटीदारने 15 धावा केल्या. आरसीबी क्वालिफायर 1 सामन्यात पंजाब किंग्सला धूळ चारून आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. आता पंजाब किंग्सला फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी एलिमिनिटर सामन्यातील विजेत्या सोबत क्वालिफायर 2 सामन्यात विजय मिळवावा लागेल. आरसीबी यापूर्वी 2009, 2011 आणि 2016 यावर्षी सुद्धा आयपीएल फायनल खेळली होती. मात्र यात फायनल सामन्यात विजय मिळवण्यात त्यांना अपयश आलं होतं.
पंजाब किंग्सने प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात विजयासाठी 102 धावांचं दिलेलं टार्गेट आरसीबीने अवघ्या 10 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. अशी कामगिरी करणारा आरसीबी संघ आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ ठरला. यापूर्वी कोणत्याही संघाने प्लेऑफ सामन्यात जवळपास 10 ओव्हर्स शिल्लक ठेऊन विजय मिळवला नव्हता. त्यामुळे 10 ओव्हर्स शिल्लक असताना आयपीएल प्लेऑफमधील हा सर्वात मोठा विजय आहे.