IPL 2025 Vaibhav Suryavanshi First Ball Six: नवख्या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन देणारा मंच म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या यंदाच्या पर्वात वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी एका तरुण खेळाडूने पदार्पण केलं आहे. शनिवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सदरम्यानच्या (RR vs LSG) सामन्यात संजू सॅमसनला दुखापतीमुळे खेळता आलं नाही. त्यामुळे त्याच्याजागी राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी रियान परागवर सोपवतानाच संजूच्या जागी 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला खेळायची संधी देण्यात आली. मोठमोठे दिग्गज फलंदाज जिथे उत्तम कामगिरी करताना बिचकतात किंंवा दबावाखाली असतात तिथे वैभव सूर्यवंशीने पहिल्याच सामन्यात आपल्या फलंदाजीने प्राभव पाडला. मिळालेल्या संधीचं सोनं करत वैभवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीमधील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत आपण छोटा पॅकेट बडा धमका पद्धतीचे खेळाडू असल्याचं सूचित केलं.
आयपीएलच्या इतिहासामध्ये कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावण्याची कामगिरी करणारा वैभव 10 वा खेळाडू ठरला. वैभवने पदार्पणाच्या सामन्यात 20 चेंडूत 34 धावांची दमदार खेळी केली. राजस्थान रॉयल्सचा संघ होमग्राउंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनौविरुद्ध खेळत असताना बाद झाल्यानंतर वैभवला अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.
वैभव अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलेला असतानाच दुसरीकडे अमेरिकेमध्येही जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेले 8342 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक, गुगलचे कार्यकारी अध्यक्ष सुंदर पिचाईसुद्धा वैभवची फटकेबाजी पाहण्यासाठी अमेरिकी वेळेप्रमाणे सकाळीच टीव्हीसमोर बसल्याचं त्यांनी स्वत: सांगितलं. वैभवच्या खेळीचं कौतुक पिचाई यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन केलं आहे.
पहिल्याच चेंडूंवर वैभवने लगावलेल्या षटकाराचा आयपीएलच्या एक्स हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेला व्हिडीओ सुंदर पिचाई यांनी रिट्वीट केला. ही पोस्ट करताना पिचाई यांनी, "सकाळी उठलो तेव्हा आठवीतल्या मुलाला आयपीएलमध्ये पदार्पण करताना पाहिलं. कसलं दमदार पदार्पण आहे," अशी कॅप्शन देत वैभवचं कौतुक केलं.
Woke up to watch an 8th grader play in the IPL!!!! What a debut! https://t.co/KMR7TfnVmL
— Sundar Pichai (@sundarpichai) April 19, 2025
वैभवने त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 170 होता. आरआरने त्याला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 1 कोटी 10 लाख रुपयांना खरेदी केले होते. आरआरसमोर विजयासाठी 181 धावांचे लक्ष्य होते. हा अटीतटीचा सामना लखनऊने अवघ्या दोन धावांनी जिंकला. निर्धारित 20 षटकांमध्ये राजस्थानला 178 धावांपर्यंतच मजल मारता आली.