IPL 2025: लखनऊविरोधातील सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेरच्या ओव्हरमध्ये तिलक वर्माला रिटायर्ड करण्याचा निर्णय घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक संजय बांगर यानेही या निर्णयावर नाराजी जाहीर केली आहे. तिलक वर्मा मैदानात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला होता. पण त्याला स्फोटक फलंदाजी करण्यासाठी हवा तो सूरच गवसत नव्हता. त्याने 23 चेंडूत फक्त 25 धावा केल्यानंतर संघाने त्याला पुन्हा माघारी बोलावलं. पण मुंबई इंडियन्स संघाला या निर्णयाचा काही फायदा झाला नाही. मुंबई इंडियन्सने 12 धावांनी हा सामना गमावला. मुंबईच्या या निर्णयावर चाहते आणि समीक्षकांनी नाराजी जाहीर केली. कारण तिलक वर्माच्या जागी आलेला मिशेल सँटर मोठे फटके लगावण्यास सक्षम नाही. आणि तो मैदानात आल्यानंतर अखेरच्या सात चेंडूंपैकी फक्त दोनच चेंडू खेळला.
तिलक वर्माला रिटायर्ड करण्याच्या मुंबई इंडियन्स संघाच्या निर्णयाचा सामन्यावर फारसा परिणाम झाला नाही. पण जर हा लवकर निर्णय घेतला तर कदाचित सँटरला जास्त चेंडू खेळण्यास मिळाले असते आणि फरक पडला असता असं संजय बांगरने म्हटलं आहे.
A collection of Reactions on Tilak Verma retired out
— ICT Fan (@Delphy06) April 4, 2025
A thread
"It was obvious that we needed some hits and he was not getting... in cricket,I think the decision speaks for itself why we did it," Hardik Pandya said after the defeat.pic.twitter.com/VCmqhfeHXD
"मला वाटत नाही की, रिटायर्ड करण्याच्या निर्णयाचा सामन्यावर फार परिणाम झाला. पण जर तो थोडा लवकर रिटायर्ड झाला असता, तर शेवटच्या षटकात किती धावा करायच्या होत्या यावर परिणाम झाला असता, परंतु त्याचा परिणाम असा झाला की सँटनरच्या वाट्याला शेवटचे दोन चेंडू आले," असं बांगरने ESPNCricinfo ला सांगितले.
आरसीबीच्या माजी प्रशिक्षकाने फलंदाजीसाठी येणारा पुढील खेळाडू किरॉन पोलार्ड नव्हता असं सांगताना व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे तिलकचा त्याच्या क्षमतेवरील आत्मविश्वास कमी झाला असेल असंही म्हटलं.
"कदाचित तिलकलाही काही चांगले चेंडू खेळण्यास मिळाले असते. म्हणजे नंतर येणारा खेळाडू काही पोलार्ड वैगेरे नव्हता. म्हणजे तुम्ही तुमच्या एका अव्वल खेळाडूला खाली खेचलं असं केल्याने त्याला खूप वाईट वाटलं असेल," असं ते म्हणाले.
मुंबई इंडियन्स संघाचा माजी प्रशिक्षक मार्क बाऊचर याने म्हटलं आहे की, तिलक वर्माने सूर्यकुमारसह 66 धावांची भागीदारी करत डाव सांभाळला. पण त्याच्याकडून चौकार जात नव्हते. लखनऊ संघानेही त्याला गोलंदाजीत रोखलं होतं.
"तिलकने खरं तर सूर्यासोबत भागीदारी करताना चांगली भूमिका निभावली. तुम्ही त्याच्या प्रतिभेनुसार त्याच्याकडून अपेक्षा करणार. पण तो दिवस त्याच्यासाठी नव्हता. मला वाटतं लखनऊने त्याला फार चांगली गोलंदाजी केली," असं मार्क बाऊचरने सांगितलं. तसंच मुंबई संघाचा फलंदाज प्रशिक्षक पोलार्ड त्याच्याशी यासंदर्भात नक्की चर्चा करेल असं म्हटलं आहे.