MI VS PBKS : आयपीएल 2025 मध्ये 1 जून रोजी पार पडलेल्या क्वालिफायर 2 सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर (PBKS VS MI) 5 विकेटने विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सचा संघ 11 वर्षांनी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला. आता 3 जून रोजी आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल सामना होणार आहे. श्रेयस अय्यरने आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी 41 बॉलमध्ये 87 धावांची दमदार खेळी केली. त्याने आपल्या इनिंगमध्ये 5 चौकार आणि 8 षटकार लगावले. परंतु सामना संपल्यावर श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचा स्टार फलंदाज शशांक सिंहवर चिडलेला दिसला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पावसामुळे क्वालिफायर 2 सामना सुरु व्हायला उशीर झाला. त्यानंतर सामन्याला सुरुवात झाली तेव्हा मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 203 धावा केल्या. पंजाब किंग्सने विजयासाठी मिळालेलं 204 धावांचे आव्हान 1 ओव्हर आणि 5 विकेट राखून पूर्ण केलं. पंजाबच्या विजयासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद खेळी केली. खेळाडूंनी मैदानात सेलिब्रेशन केलं. त्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांशी हात मिळवण्यासाठी समोरा समोर आले. तेव्हा समोर शशांक सिंहला पाहताच श्रेयस अय्यर भडकला आणि त्याला सुनावलं. यावर शशांक काहीही न बोलता पुढे निघून गेला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
— Media (lncognltooo) June 2, 2025
श्रेयस अय्यर हा कॅप्टन कुल म्हणून ओळखला जातो. मात्र तो रागाने लाल झालेला पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटलं. त्याचं झालं असं की, पंजाब किंग्सच्या 17 व्या ओव्हरमध्ये शशांक सिंह फलंदाजी करताना 2 धावा करून रनआउट झाला. त्यावेळी संघाला 20 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता होती. हार्दिक पंड्याने 17 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मिड-ऑफवरून सरळ स्टंपवर बॉल हिट केल्याने शशांक सिंह रनआउट झाला. अत्यंत महत्वाच्या सामन्यात आणि महत्वाच्या वेळी स्वस्तात विकेट गमावल्याने श्रेयस अय्यर शशांकवर भडकला होता.
हेही वाचा : क्वालिफायर 2 मधील पराभवानंतर मुंबई इंडियन्सवर भडकले रोहितचे फॅन्स, ट्रोल होतोय हार्दिक पंड्या
शशांक सिंहच्या रन आउट चा रिप्ले जेव्हा समोर आला तेव्हा शशांक सिंगल धाव पूर्ण करताना बेपर्वाईने धावत होता. त्याने आपल्या धावण्याची गती तेव्हा वाढवली जेव्हा हार्दिक बॉल पकडण्यासाठी जोरात धावला. पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता आणि हार्दिकने स्टंपवर केलेल्या भेदक माऱ्याने त्रिफळा उडाला आणि शशांकला रनआउट होऊन मैदाना बाहेर जावं लागलं.