IPL 2025: कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानावर रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची भेट घेतली. या सामन्यातही वैभव सूर्यवंशी फार चांगली कामगिरी करु शकला नाही आणि चार धावांवर बाद झाला. राजस्थान रॉयल्सने एका धावेने हा सामना गमावला. संवाद प्रतिदिनने दिलेल्या वृत्तानुसार, वैभवला भेटण्यापूर्वी गांगुलीने संजू सॅमसन आणि राजस्थानचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेतली.
सौरव गांगुलीने यावेळी वैभवची बॅट आपल्या हातात घेतली आणि त्याला चांगलं खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. "मी तुझा खेळ पाहिला आहे. तू ज्या पद्धतीने निर्भय क्रिकेट खेळतोस तसाच खेळत राहा. तुला तुझा खेळ बदलण्याची काही गरज नाही," असा सल्ला गांगुलीने वैभवला दिला आहे.
कोलकाताने राजस्थान रॉयल्सला फक्ता एका धावेने पराभूत केलं. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात झालेल्या या सामन्यात कोलकाताने राजस्थानसमोर 207 धावांचं आव्हान उभं केलं होतं. राजस्थान रॉयल्स संघ मात्र 8 विकेट्स गमावून 205 धावाच करु शकला. सध्याच्या आयपीएल हंगामातील कोलकाताचा हा पाचवा विजय ठरला. तर दुसरीकडे राजस्थानने 12 पैकी 9 सामने गमावले आहेत. राजस्थान संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा आधीच संपल्या आहेत.
राजस्थान संघाला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज होती. वैभव अरोराने या ओव्हरमध्ये शुभम ओव्हरला दोन षटकार आणि एक चौकार लगावून विजयाच्या आशा पल्लवित केल्या. अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना वैभव कमाल करेल असं वाटत होतं. पण वैभव मोठा फटका खेळू शकला नाही आणि दुसऱी धाव घेताना जोफ्रा आर्चर धावबाद झाला. राजस्थानचा कर्णधार रियान परागने तुफान फटकेबाजी करत 95 धावा केल्या,. पण त्याची खेळी वाया गेली.
"मी बाद झाल्यानंतर मला फार वाईट वाटलं. कदाचित माझ्याकडून गणित चुकलं. मी सामना संपवायला हवा होता. मला वाटतं शेवटच्या सहा ओव्हर्समध्ये चांगले पर्याय मिळाले असते. मला वाटतं ते 120 किंवा 130 धावांवर असताना आमच्या फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आम्ही त्यांच्या धावा आणखी रोखू शकलो असतो. पण सामना आमच्या हातात होता. आम्ही तो पूर्ण करायला हवा होता," असं रियान परागने सामना संपल्यानंतर म्हटलं.