Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धोनीच्या 9 व्या नंबवरील बॅटिंगवरुन जुंपली! तिवारी म्हणाला, 'कोणाची हिंमत..', सेहवाग म्हणतो, 'तो..'

IPL 2025 Dhoni Batted At Number 9: यापूर्वीही धोनी एकदा नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी तो शून्यावर बाद झालेला.

धोनीच्या 9 व्या नंबवरील बॅटिंगवरुन जुंपली! तिवारी म्हणाला, 'कोणाची हिंमत..', सेहवाग म्हणतो, 'तो..'

IPL 2025 Dhoni Batted At Number 9: भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकांवर निशाणा साधला आहे. महेंद्र सिंग धोनीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जण्यास सांगण्याची हिंमत सीएसकेच्या प्रशिक्षकांना झाली नाही, अशी टीका मनोज तिवारीने केली आहे. 28 मार्च रोजी चेपॉकच्या मैदानात झालेल्या सामन्यामध्ये चेन्नईचा 50 धावांनी पराभव झाला. संघाला 43 बॉलमध्ये 90 धावांची गरज असताना धोनी फलंदाजीला न येता तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तोपर्यंत सामना चेन्नईच्या हातातून निसटल्यात जमा होता. धोनी एवढ्या तळाला खेळायला आल्यावरुन चाहत्यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.

संघ व्यवस्थापनावर निशाणा

यासंदर्भात 'क्रिकबझ'शी बोलताना तिवारीने चेन्नईच्या संघातील व्यवस्थापनावर निशाणा साधला आहे. सामना जिंकण्यासाठी अनुभवी खेळाडूची गरज असताना संघ व्यवस्थापनाला धोनीला फलंदाजीसाठी वर पाठवण्याची किंवा तसं करायला सांगण्याची हिंमत झाली नाही, असं तिवारी म्हणाला आहे. प्रशिक्षकांपैकी कोणामध्येही हिंमत नव्हती असं म्हणत तिवारीने संघ व्यवस्थापनाच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

जिंकण्यासाठीच खेळताय ना?

"धोनीसारख्या खेळाडूला एवढ्या उशीरा पाठवण्यामागील कारण मला तर कळालं नाही. तो 16 बॉलमध्ये 30 धावा करुन नाबाद राहिला, पण मूळ मुद्दा हा आहे की तो फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर का आला नाही? तुम्ही जिंकण्यासाठीच खेळत आहात ना?" असा सवाल तिवारीने चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला केला आहे. "प्रशिक्षकांपैकी कोणमध्येही धोनीला वरच्या क्रमाकांकावर फलंदाजीसाठी जा असं सांगण्याची हिंमत नव्हती. तो जे ठरवेल ते अंतिम असं असतं," असा घणाघात तिवारीने केला आहे. 

नक्की वाचा >> RCB विरुद्धचा मॅचनंतर राडा! ...म्हणून मी CSK साठी अगदी तळाशी बॅटींग करतो; धोनीचं स्पष्टीकरण

सेहवागकडून धोनीची पाठराखण

याच कार्यक्रमात बोलताना सेहवागने सर्वांच्या मताच्याविरुद्ध मत नोंदवत धोनीच्या निर्णयाची पाठराखण केली आहे. सामन्यामधील आरसीबीचं वर्चस्व पाहता धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला असता तरी विशेष फरक पडला नसता. तळाशी फलंदाजी करण्याची धोनीची भूमिका आधीपासूनची आहे. सामन्यातील स्थिती काहीही असली तरी तो तळाशीच फलंदाजीला येतो, असं सेहवागने सांगितलं. 

त्याने आणि संघाने ठरवलंय की...

"तळाला फलंदाजी करण्याचं त्याने आणि संघाने ठरवलं आहे. तो ठराविक चेंडू खेळेल असं ठरलेलं आहे. तो कायम 17 ते 18 ओव्हरदरम्यान फलंदाजीसाठी येतो. तो बंगळुरुविरुद्धही त्याच परिस्थितीत फलंदाजीसाठी आल्याचं पाहून मला आश्चर्य वाटलं नाही. तो वर खेळायला आला असता तर सामन्यावर काही विशेष प्रभाव पडला नसता कारण आरसीबीचा संघ फारच उत्तम खेळत होता," असं निरिक्षण सेहवागने नोंदवलं. 

दुसऱ्यांदा नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला

धोनी 2024 च्या आयपीएलपासून तळाला फलंदाजीसाठी येतो. यापूर्वी तो 2024 मध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला. तिथे त्याला हर्श पटेलने शून्यावर बाद केलं होतं.

Read More