Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'मी RCB ची सुरुवात केली तेव्हा...', IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर विजय माल्या भावूक; म्हणाले, '18 वर्षांपासून विराट...'

Vijay Mallya On RCB Win IPL Trophy: आयपीएलच्या इतिहासामध्ये आरसीबीने पहिल्यांदाच जेतेपदावर आपलं नाव कोरलं असून या ऐतिहासिक कामगिरीनंतर आरसीबीच्या मालकांनी भावनांना वाट मोकळी करुन दिलीये.

'मी RCB ची सुरुवात केली तेव्हा...', IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर विजय माल्या भावूक; म्हणाले, '18 वर्षांपासून विराट...'

Vijay Mallya On RCB Win IPL Trophy: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वाची सांगता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा चषक विजयाचा दुष्काळ संपवत झाली. विराट कोहली मागील 18 वर्षांपासून जे स्वप्न उराशी बाळगून होता ते स्वप्न अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी रात्री पूर्ण जालं. 191 धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाब किंग्जच्या संघाला 184 पर्यंतच मजल मारता आली आणि आरसीबीच्या गळ्यात पहिल्यांदाच आयपीएलच्या जेतेपदाची माळ पडली. सामन्यातील शेवटचे चार चेंडू शिल्लक असतानाच आता पंजाबला जिंकणं अशक्य आहे हे निश्चित झालं तेव्हाच बॉण्ड्रीजवळ उभा असलेला विराट भावूक झाला अन् त्याचे डोळे भरुन आले. हे दृष्य पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले.

माल्या आणि त्यांच्या लेकाची प्रतिक्रिया

आरसीबीच्या विजयानंतर मैदानाबरोबरच जगभरातील आरसीबी चाहत्यांनी आपआपल्या पद्धतीने जल्लोष साजरा केला. मी मागील 18 वर्षांपासून संघासाठी सर्वकाही दिलं आहे. हे माझं स्वप्न होतं जे पूर्ण झालंय, असं विराटने सामन्यानंतर म्हटलं. दरम्यान या विजयानंतर आरसीबीचे मालक उद्योजक विजय माल्या यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. माल्या सध्या आर्थिक घोटाळ्यांचे आरोप असल्याने देशाबाहेर आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी भारतात पाऊलही ठेवलेलं नाही. मात्र आरसीबीच्या विजयानंतर त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देताना संघ स्थापनाच्या वेळेचे काही संदर्भ देत पोस्ट केली आहे. तर दुसरीकडे त्यांचा पुत्र सिद्धार्थ माल्याचा आरसीबीच्या विजयानंतरचा व्हिडीओ समोर आलाय.

पहिल्या पोस्टमध्ये सर्वांचाच उल्लेख

विजय माल्या यांनी भारतीय वेळेनुसार रात्री पावणे बाराच्या सुमार केलेल्या पहिल्या पोस्टमध्ये, "अखेर 18 वर्षानंतर आरसीबीच्या संघाने आयपीएलचं जेतेपद पटकावलं. 2025 च्या संपूर्ण स्पर्धेत संघाची कामगिरी उत्तम राहिली. योग्य समतोल असलेला संघ चांगल्या प्रशिक्षणाखाली आणि सहाय्यकांच्या देखरेखीखाली छान खेळला. सर्वांचे अभिनंदन! इ साला कप नामदे! (या वर्षी कप आपण जिंकलो)" असं म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

"आरसीबीची स्थापना केली तेव्हा..."

"मी जेव्हा आरसीबीचा पाया रचला तेव्हा आयपीएलची ट्रॉफी बंगळुरुमध्ये यावी अशी माझी फार इच्छा होती. त्यावेळी मला तरुण वयातील विराट कोहलीला निवडण्याची संधी मिळाली. तो मागील 18 वर्षांपासून आरसीबीसोबत राहिला हे फारच कौतुकास्पद आहे. मला युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलिअर्स यांनाही निवडण्याची संधी मिळाली. ते आरसीबीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे आणि अढळ असे शिलेदार आहेत. अखेर आयपीएलचा चषक बंगळुरुमध्ये आला. अभिनंदन आणि सर्वांचा मी पुन्हा एकदा आभारी आहे ज्यांनी माझं स्वप्न सत्यात आणण्यासाठी योगदान दिलं. आरसीबीचे चाहते सर्वोत्तम आहेत. ते खरोखरच या चषकासाठी पात्र आहेत. हा चषक आता बंगळुरुला येतोय!" असं माल्या यांनी आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सिद्धार्थ माल्याचा व्हिडीओही व्हायरल

दुसरीकडे सिद्धार्थ माल्याचा टीव्हीवर आरसीबीच्या विजयाची दृष्यं पाहताना भावूक झाल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. "तब्बल 18 वर्षानंतर आपण हे चित्र पाहतोय," असं सिद्धार्थ या व्हिडीओत म्हणताना दिसतोय.

दरम्यान, बंगळुरुप्रमाणेच पुणे, दिल्ली आणि देशातील अनेक भागांमध्ये रात्री उशीरापर्यंत आरसीबीच्या चाहत्यांनी रस्त्यावर उतरुन जल्लोष साजरा केल्याचं पाहायला मिळालं.

Read More