Kavya Maran Anirudha Marriage News: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचं कुटुंब नेहमीच चर्चेत राहतं. त्यांच्या दोन मुली सौंदर्या आणि ऐश्वर्या रजनीकांत या चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. ऐश्वर्याचं अभिनेता धनुषसोबत लग्न झालं होतं पण आता ते विभक्त झाले आहेत. मात्र, रजनीकांत यांचं फिल्मी कनेक्शन इथेच थांबत नाही. रजनीकांत यांची पत्नी लता यांची बहीण लक्ष्मी राघवेंद्र यांचा मुलगा अनिरुद्ध रविचंदर हा सध्या दाक्षिणेतील सर्वात लोकप्रिय संगीतकारांपैकी एक आहे. त्याच्या संगीताची जादू अशी आहे की सगळीकडे आपल्याला त्याचीच गाणी ऐकायला मिळतात.
आता चर्चा अशी आहे की अनिरुद्ध रविचंदर लवकरच सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांची मुलगी आणि सनरायझर्स हैदराबाद IPL टीमची मालकिण काव्या मारन हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. रिपोर्स्टनुसार, अनिरुद्ध हा 34 वर्षांचा आहे आणि काव्या 32 वर्षांची आहे. ते दोघं गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांना अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. कधी डिनर डेटवर, तर कधी एकत्र सुट्टीचा आनंद घेताना.
खरंतर ही चर्चा एका व्हायरल रेडिट पोस्टमुळे सुरु झाली आहे. त्या पोस्टनुसार, दोघे बऱ्याच काळापासून एकत्र असून आता लग्न बंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत. एका रिपोर्टमध्ये तर असंही म्हटलंय की रजनीकांत यांनी स्वतः कलानिधी मारन यांची भेट घेऊन दोघांच्या नात्याविषयी चर्चा केली आहे. रेडिटवरील काही युजर्सनी तर म्हटलं की त्यांनी अनिरुद्ध आणि काव्याला लास वेगसमध्ये एकत्र फिरताना पाहिलं होतं. एका नेटकऱ्यानं म्हटलं, 'ते खूपच साधेपणानं वागत होते, पण त्यांच्याकडे पाहून स्पष्ट दिसत होतं की ते एकमेकांच्या खूप जवळ आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अनिरुद्धचा एक जुना इंटरव्ह्यू पाहताना, एका टॅरो रीडरनं भविष्यवाणी केली होती की तो एका शिकलेल्या आणि टेलिकम्युनिकेशन-ब्रॉडकास्टिंग इंडस्ट्रीत असणाऱ्या मुलीशी लग्न करेल आणि आता ती भविष्यवाणी खरी ठरताना दिसतेय.'
अनिरुद्ध एक कला प्रेमी कुटुंबातून येतो. तो अभिनेता रवि राघवेंद्र आणि शास्त्रीय नृत्यांगना लक्ष्मी यांचा मुलगा आहे. त्याची मावशी लता यांचं लग्न रजनीकांत यांच्यासोबत झालं आहे. त्याचे पणजोबा के. सुब्रमण्यम हे 1930 च्या दशकातले नामवंत चित्रपट निर्माते होते.
हेही वाचा : 27 वर्षांपूर्वींचा चित्रपट खलनायकानं 50 दिवस केली नाही अंघोळ; पाहताच गरुड आणि गिधाड यायचे अन्...
अनिरुद्धनं आजवर रजनीकांत, कमल हासन, थलापथी विजय, अजित, सूर्या, पवन कल्याण, महेश बाबू आणि ज्युनियर एनटीआरसारख्या कलाकारांसाठी संगीत दिलं आहे. नुकतंच त्यानं बॉलिवूडमध्ये शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटातून प्रवेश केला आहे. दरम्यान, त्याच्या आणि काव्याच्या लग्नाविषयी चर्चा सुरु असली तरी त्या दोघांपैकी कोणीही किंवा त्यांच्या कुटुंबातून कोणीही याविषयी अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा काही माहिती दिलेली नाही. पण त्यांचे चाहते या बातमीकडे लक्ष देऊन आहेत.