India vs England, Kumar Dharmasena Viral Video: भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल मैदानावर पाचवा कसोटी सामना 31 जुलै सुरु झाला. याच पाचव्या कसोटीत एक अनपेक्षित वाद निर्माण झाला आहे. हे वाद कोणत्या खेळाडूशी संबंधित नाही, तर थेट अंपायरशी संबंधित आहे. श्रीलंकेचे अनुभवी अंपायर कुमार धर्मसेना आता चर्चेत आले आहेत आणि त्यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप होत आहेत.
सामन्यातील एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कुमार धर्मसेना इंग्लंडच्या गोलंदाज जोश टंगच्या एका डिलिव्हरीनंतर बॅटला झालेल्या इनसाइड एजचा इशारा करताना दिसत आहेत. हीच गोष्ट वादाचा मुद्दा ठरली आहे.
जोश टंगने साई सुदर्शनला एक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यॉर्कर न होता लो फुलटॉस बनला आणि ती चेंडू इतका वेगवान होता की सुदर्शन थेट जमिनीवर कोसळला. इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार एलबीडब्ल्यूची अपील केली, पण रिव्ह्यू घेतला नाही. पुढे रिव्ह्यूमध्ये स्पष्ट दिसले की चेंडू पॅडला लागण्याआधी बॅटला स्पर्शून गेला होता. पण खरी चर्चा धर्मसेनांच्या हाताच्या एका इशाऱ्यावर सुरु झाली, जो नियमांच्या चौकटीत बसत नाही. हा इशारा इनसाइड एजचा होता, जो अंपायरने रिव्ह्यू न घेतलेल्या निर्णयाच्या आधी का केला, असा सवाल नेटिझन्सनी उपस्थित केला आहे.
Experts react as #KumarDharmasena makes a lightning-quick LBW call on #SaiSudharsan
— Star Sports (@StarSportsIndia) July 31, 2025
Did he judge it too quickly or just perfectly? #ENGvIND 5th TEST, DAY 1 | LIVE NOW on JioHotstar https://t.co/04PYjgM7su pic.twitter.com/LJuKFV5Own
नेटकऱ्यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी धर्मसेनांवर पक्षपाती अंपायरिंगचे आरोप केले आहेत. 'हे निष्पक्ष होतं का?', 'धर्मसेनांनी इंग्लंडला मदत केली का?' असे प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
दरम्यान, या सामन्यात भारतीय संघ चार मोठ्या बदलांसह मैदानात उतरला आहे. कर्णधार शुभमन गिलने टॉसवेळी सांगितले की, ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर आहेत आणि जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती देण्यात आली आहे. शार्दुल ठाकूर आणि अंशुल कंबोज यांनाही अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले नाही. या बदलांमुळे ध्रुव जुरेल, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप आणि करुण नायर यांची संघात पुनरागमन झाले आहे.