Jadeja gets distracted during fifth Test: केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी एक गमतीशीर घटना घडली. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) फलंदाजी करत असताना अचानक त्याचं लक्ष विचलित झालं आणि त्याचं कारण होतं स्टँडमध्ये बसलेला एक प्रेक्षक आणि त्याची लाल रंगाची टी-शर्ट! नक्की काय झालं ते जाणून घेऊयात.
तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात जेव्हा जडेजा फलंदाजी करत होता, त्याचवेळी त्याचं वारंवार लक्ष एका प्रेक्षकाकडे जात होतं. ही बाब सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. काही वेळातच एक सिक्युरिटी गार्ड त्या प्रेक्षकाकडे गेला आणि त्याला ग्रे रंगाचा शर्ट देऊन तो घालायला सांगितला. प्रेक्षकाने तो लगेच घातला. जडेजाने त्याला अंगठा दाखवून धन्यवाद दिले आणि लगेच जेमी ओव्हर्टनच्या बाउंसरवर शानदार चौकारही ठोकला.
जडेजा इंग्लंडसाठी मोठी अडचण ठरत होता. त्याने दमदार अर्धशतक झळकावत टेस्ट मालिकेत 500 हून अधिक धावा पूर्ण केल्या. भारताकडून एका द्विपक्षीय टेस्ट मालिकेत हे कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याने वीव्हीएस लक्ष्मणचा 474 धावांचा विक्रम सहज मागे टाकत एक ऐतिहासिक कामगिरी केली. इतकंच नाही, तर इंग्लंडमध्ये एका मालिकेत भारताकडून सर्वाधिक वेळा (6 वेळा) 50 किंवा अधिक धावा करणारा खेळाडू बनत, त्याने सुनील गावसकरचा विक्रमही मोडला.
या कामगिरीसह तो वेस्ट इंडिजचा गॅरी अलेक्झांडर आणि पाकिस्तानचा वसीम राजा यांच्या रांगेत सामील झाला आहे. या तिघांनीही सहाव्या क्रमांकापासून खाली फलंदाजी करत परदेशातील टेस्ट मालिकांमध्ये सहा वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. भारताच्या या शानदार दौऱ्यात तिघांनी 500+ धावा करत वर्चस्व गाजवलं आहे. शुभमन गिलने 754 धावा (सरासरी 75.40) करत सर्वोच्च स्थान पटकावलं, त्याच्यामागे के. एल. राहुलने 532 धावा (सरासरी 53.20) केल्या, आणि जडेजा तिसऱ्या क्रमांकावर 516 धावांसह होता.
Ravindra Jadeja departs, but not before completing his 27th Test half-century
— BCCI (@BCCI) August 2, 2025
Updates https://t.co/Tc2xpWMCJ6#TeamIndia | #ENGvIND | @imjadeja pic.twitter.com/1MNEN1VQNv
मात्र, जडेजाची खेळी दुर्दैवी पद्धतीने संपली. जोश टंगच्या चेंडूवर स्लॅश करताना त्याचा बॅटचा बाह्य भाग लागला आणि बॉल थेट दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या हॅरी ब्रूकच्या हातात गेला. जडेजा निराश झाला आणि त्यानं चक्क स्टंप्सवर चेंडू फेकण्याचा इशारा केला. त्याने 77 चेंडूंमध्ये 53 धावा करत ड्रेसिंग रूमचा रस्ता धरला. जडेजाच्या संयमी खेळीचा चांगला फायदा वॉशिंग्टन सुंदरने घेतला. त्याने टी-20 स्टाईलमध्ये 46 चेंडूंमध्ये 53 धावांची झंझावाती खेळी करत भारताचा डाव सावरला आणि इंग्लंडसमोर 374 धावांचं लक्ष्य उभं केलं.