भारतीय संघ आता इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने शुभमन गिलकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वातील भारतीय संघाचं नेतृत्व अनुभवी जसप्रीत बुमराहकडे न दिल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. जसप्रीत बुमराहने आता यावर भाष्य केलं असून, यामागील कारणांचा खुलासा केला आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीने मला कर्णधारपद सोपवलं होतं, मात्र वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणास्तव आपण ती जबाबदारी घेण्यास नकार दिला अशी माहिती जसप्रीत बुमराहने दिली आहे.
जसप्रीत बुमराहने नकार दिल्यानंतर रोहित शर्माच्या जागी कर्णधारपदासाठी शुभमन गिलच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तसंच ऋषभ पंतला उपकर्णधार करण्यात आलं आहे. बुमराहने स्काय स्पोर्ट्सवर दिनेश कार्तिकशी संवाद साधताना आपलं बीसीसीआय निवडकर्त्यांसोबत वर्कलोडसंदर्भात झालेली चर्चा आणि कर्णधारपद सोडणं आपल्यासाठी किती कठीण होतं यावर भाष्य केलं.
"आयपीएल दरम्यान रोहित आणि विराट निवृत्त होण्यापूर्वी, मी बीसीसीआयशी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत माझ्या कामाच्या ताणाबद्दल बोललो होतो. मी माझ्या पाठीची काळजी घेणाऱ्यांसोबतही चर्चा केली होती. मी सर्जनशीही बोललो आहे, ज्यांनी नेहमीच मला कामाच्या ताणाबद्दल किती हुशार असायला हवं याबद्दल सांगितले आहे. म्हणून मी त्यांच्याशी बोललो आणि मग आम्ही असा निष्कर्ष काढला की मला थोडं स्मार्ट व्हावं लागेल. मग मी बीसीसीआयला फोन केला आणि सांगितलं की मला नेतृत्वाच्या भूमिकेत पाहण्याची इच्छा नाही, कारण मी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्व कसोटी खेळू शकणार नाही," असं बुमराह म्हणाला.
बुमराह गेल्या काही काळापासून दुखापतींचा सामना करत आहे. तसंच बीसीसीयआनेही बुमराह सर्व कसोटी सामने खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
त्याने पुढे बोलताना सांगितलं की, "हो, बीसीसीआय नेतृत्वाच्या दृष्टीकोनातून माझ्याकडे पाहत होतं. पण मला हे संघाच्या दृष्टीने योग्य वाटत नसल्याचं सांगावं लागलं. म्हणजे पाच सामन्यांच्या मालिकेत इतक कोणीतरी दोन सामन्यात नेतृत्व करत आहे हे दिसालयालही ठीक वाटत नाही. हे संघासाठी योग्य नाही आणि मला नेहमीच संघाला प्राधान्य द्यायचं होतं".