Kapil Dev on Jasprit Bumrah: गेल्या अनेक दिवसांपासून गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कामगिरीबद्दल, त्याच्या हेल्थबद्दल आणि त्याच्या निवृत्तीबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. त्याच्या निवृत्तीच्या चर्चांमध्ये अनेक बड्या आणि जुन्या खेळाडूंनीही आपलं मत नोंदवलं आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू असतानाच, माजी कर्णधार कपिल देव यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. "तो निवृत्तच होऊ नये" असं कपिल देव ठामपणे म्हणाले आहेत.
बुमराहच्या तंदुरुस्तीची चिंता आणि काही कसोट्यांमधून विश्रांती दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं असताना कपिल देव यांनी स्पष्ट केलं की, "बुमराहने कोणताही ताण न घेता मोकळेपणाने खेळायला हवं. त्याच्या शरीरावर ताण नक्कीच आहे, पण त्याचं योगदान अविश्वसनीय आहे. आम्ही कधीच विचार केला नव्हता की तो इतकं लांब खेळेल. तो खूप शारीरिक ताण सहन करत आहे. आजच्या काळात खेळाडूंच्या शरीरांची घडण वेगळी आहे, त्यामुळे तुलना करणे योग्य नाही. पण क्रिकेटप्रेमी म्हणून मी म्हणेन, तो निवृत्तच होऊ नये. अर्थात, शेवटी एक दिवस प्रत्येकाला थांबावंच लागतं."
दरम्यान, माजी खेळाडू मोहम्मद कैफ यांनी मात्र बुमराहच्या कसोटी भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कैफ म्हणाले, "जसजसे रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर. अश्विन कसोटीपासून बाजूला झाले आहेत, तसंच बुमराहही पुढचा असू शकतो. मी आशा करतो की तसं होणार नाही, पण त्याच्या हालचालीत ती सहजता दिसत नाही. त्याचा प्रयत्न आहे, पण शरीर थकतंय असं दिसतं." इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत बुमराहने 28 षटकांत केवळ 1 विकेट घेतली, ज्यामुळे कैफ यांचा अंदाज अधिक बळकट झाला.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीत बुमराहने एका डावात प्रथमच 100 धावा दिल्या, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील नोंद होय. एवढंच नव्हे, तर त्याचा वेगही घटल्याचं निदर्शनास आलं. पहिल्या कसोटीत (हेडिंग्ले) त्याने 40% चेंडू 140 किमी/तास वेगाने बॉल टाकले होते. तिसऱ्या कसोटीत (लॉर्ड्स) हे प्रमाण 27% होतं. मात्र, मँचेस्टरच्या चौथ्या कसोटीत बुमराह एकदाही 140 किमी/तासच्या वर गेला नाही, जे स्पष्टपणे त्याच्या क्षमतेत घसरण दर्शवतं.
जसप्रीत बुमराहच्या कसोटी कारकिर्दीविषयी सध्या अनेक चर्चा सुरू असल्या तरी, कपिल देव यांच्यासारख्या दिग्गजाचा त्याच्यासाठी असलेला पाठिंबा महत्त्वाचा आहे. मात्र, मैदानावर दिसणाऱ्या फॉर्म आणि तंदुरुस्तीच्या आधारे बुमराहसमोर मोठं आव्हान उभं आहे.