Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

इम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण या भारतीयांनी फेटाळलं

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान १८ ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे.

इम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण या भारतीयांनी फेटाळलं

मुंबई : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान १८ ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, कपील देव आणि नवजोतसिंग सिद्धू यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. पण कपील देव आणि सुनील गावसकर इम्रान खानच्या शपथविधीला जाणार नाहीत. वैयक्तिक कारणासाठी आपण इम्रान खानच्या शपथविधीला जाऊ शकत नसल्याचं कपील देव यांनी सांगितलं. तर भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरिजनिमित्त गावसकर इंग्लंडमध्ये कॉमेंट्री करत आहेत. त्यामुळे गावसकर यांनाही या सोहळ्याला जाता येणार नाही. याबाबत गावसकर यांनी १२ ऑगस्टलाच इम्रान खानला कळवलं आहे.

कपील देव आणि सुनील गावसकर हे शपथविधी सोहळ्याला जाणार नसले तरी नवजोतसिंग सिद्धूनं मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाकडे शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानला जायची परवानगी मागितली आहे. काँग्रेसचे नेते असलेले सिद्धू हे पंजाब सरकारमध्ये मंत्रीही आहेत. सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही याबाबत माहिती दिली आहे.

कपील देव इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला जाऊ शकत नसले तरी त्यांनी इम्रान खान आणि त्याच्या पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. मागच्या २० वर्षांपासून इम्राननं देशासाठी कठोर मेहनत केली आहे आणि याचं फळ त्याला आता मिळालं आहे. भविष्यातही तो अशीच वाटचाल करेल अशी मला अपेक्षा असल्याचं कपील देव म्हणाले. तसंच इम्रान खान पंतप्रधान झाल्यामुळे भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारतील, असा विश्वास कपील देव यांनी व्यक्त केला आहे.

इम्रान खाननं अधिकृतरित्या बोलावलं तर आपण शपथविधी सोहळ्याला जायचा विचार करु, असं कपील देव याआधी म्हणाले होते. यानंतर इम्रान खाननं कपील देव यांना निमंत्रण पाठवलं होतं. पण आता कपील देव यांनी वैयक्तिक कारण देऊन या सोहळ्याला जायला नकार दिला आहे. 

Read More