Reject CM Cash Award Of 5 Lakh Rs Each: नुकत्याच पार पडलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाने जेतेपदावर नाव कोरलं. या जग्गजेत्या संघाचा भाग असलेल्या दोन खेळाडूंनी राज्य सरकारने देऊ केलेलं प्रत्येकी 5 लाख रुपयांचं बक्षीस नाकारलं आहे. या खेळाडूंनी त्यांना जो मानसन्मान मिळाला पाहिजे तो दिला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. हा सारा प्रकार महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटकमध्ये घडला असला तरी या प्रकरणामागील महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी विश्वविजेत्या भारतीय पुरुष खो खो संघातील एम. के. गौतम आणि महिला संघातील चित्रा बी या दोघांचा सत्कार करुन कौतुक केलं. मात्र मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेला हा सत्कार समाधानकारक नाही. सरकारकडून देण्यात आलेलं 5 लाख रुपये रोख रक्कमेचं बक्षीस आपल्याला हा खेळ खेळत राहण्यासाठी प्रेरणा देण्याइतकं समाधानकारक नाही असंही या दोन खेळाडूंनी म्हटलं आहे. तसेच आपण कोणालाही हा खेळ खेळावा असं प्रेरणा देण्याइतकीही ही रक्कम आणि सन्मान नसल्याचं दोघांनी नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे.
एम. के. गौतम आणि चित्रा बी. या दोघांनी महाराष्ट्रातील खो खो संघातील विजेत्यांना तेथील राज्य सरकारने 2.25 कोटी रुपये रोख रक्कमेचं बक्षीस आणि विजेत्या खेळाडूंना सरकारी नोकरी देण्याची घोषणा केल्याचं म्हटलं आहे. हा संदर्भ देत पाच लाखांची रक्कम नाकारताना गोतमने, "आम्ही पुरस्कार नाकारुन मुख्यमंत्र्यांचा अवमान करु इ्छित नाही. मात्र आम्हाला जो सन्मान दिला पाहिजे तो दिला जात नसल्याची आमची भावना आहे. म्हणूनच आम्ही हे बक्षीस नाकारत आहोत," असं म्हटलं आहे. बंगळुरुमध्ये पत्रकारांशी बोलताना गौतमने, कर्नाटक सरकारने या प्रकरणात लक्ष घालवं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शेजारच्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय करण्यात आलं ते पहावं आणि काय ते ठरवावं, असा सल्ला गौतमने कर्नाटक सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र वगळता केवळ कर्नाटकमध्ये खो खो खेळ खेळला जातो असं गौतमने अधोरेखित केलं आहे. "सध्या पालक त्यांच्या पालकांना गावाकडील खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देत नाहीत. सर्व सरकारी निधी केवळ क्रिकेटसाठी दिला जातो. शेवटचा चेंडू खेळण्याआधीच सरकार ट्विटरवर पैसे आणि बक्षिसाची रक्कम जाहीर करते," असा टोला गौतमने लगावला.
Kho Kho World Cup Winners MK Gautham & Chaitra of Karnataka has rejected the cash award of 5 lakhs.
— The Khel India (@TheKhelIndia) January 29, 2025
They expressed dissatisfaction with the recognition they received from the CM Siddaramaiah. pic.twitter.com/cbu2d3MhUc
चित्रानेही आपली नाराजी व्यक्त करताना, "वर्ल्ड कप खेळणाऱ्या इतर खेळाडूंना जितकी रक्कम देण्यात आली तितकीच रक्कम आम्हाला दिली जावी अशी माची मागणी आहे. इतर खेळातील खेळाडूंप्रमाणे आम्ही सुद्धा पदक जिंकलं आहे. मात्र इतर खेळातील खेळाडूंना ज्या सुविधा दिल्या जातात त्यापासून आम्ही वंचित आहोत," असं म्हटलं.