Piyush Chawla Retirement : आयपीएल 2025 सुरु असतानाच काही दिवसांपूर्वी माजी कर्णधार रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता मुंबई इंडियन्समधील रोहित शर्माचा जवळचा मित्र आणि दोनदा भारताच्या वर्ल्ड कप संघाचा भाग असणारा पियूष चावलाने (Piyush Chawla) वयाच्या 36 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
पियूष चावलाने सोशल मीडियावर त्याच्या निवृत्ती विषयी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. तब्बल 19 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर पियूष चावलाने क्रिकेट रामराम ठोकला आहे. पियूष चावलाने 2006 मध्ये भारताकडून इंग्लंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.त्याच वर्षी त्याला वनडे क्रिकेटमध्ये सुद्धा पदार्पणाची संधी मिळाली. पियूष चावला केवळ 3 टेस्ट सामने खेळू शकला. तर वनडेमध्ये त्याने भारताकडून 25 सामने खेळले. तर टी 20 क्रिकेटमधील 7 सामन्यात त्याला भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. पीयूषने टेस्ट क्रिकेटमध्ये 7, वनडेमध्ये 32 तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 4 विकेट घेतले.
हेही वाचा : आनंदोत्सव महागात पडला! चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरिल चेंगराचेंगरी प्रकरणी RCB आणि KSCA विरुद्ध FIR दाखल
पियूष चावलाला भारतीय संघात खेळण्याची फार संधी मिळाली नसली तरी तो मागील अनेक वर्ष आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करत होता. परंतु आयपीएल 2025 मध्ये पियूष चावलाला रिटेन करण्यात आलं नाही. त्यामुळे तो मेगा ऑक्शनमध्ये आला. मात्र तिथे देखील कोणत्याही संघाने त्याला संघात घेण्यासाठी बोली न लावल्यामुळे तो अनसोल्ड ठरला. आता आयपीएल 2025 च्या फायनलनंतर त्यानं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. पियूष चावला हा रोहित शर्माचा जवळचा मित्र असून अनेक वर्ष दोघांनी मुंबई इंडियन्ससाठी क्रिकेट खेळलं आहे.