Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रवींद्र जडेजाच्या घरात 'अंतर्कलह', पत्नी भाजपमध्ये तर वडिल-बहिण काँग्रेसमध्ये

देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात आहे.

रवींद्र जडेजाच्या घरात 'अंतर्कलह', पत्नी भाजपमध्ये तर वडिल-बहिण काँग्रेसमध्ये

जामनगर : देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात आहे. अनेक पक्षांमध्ये नेत्यांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरूच आहे. काही नेत्यांची मुलं एका पक्षात आणि नेते दुसऱ्या पक्षात अशी परिस्थिती आहे. पण भारतीय टीमचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा याच्या घरामध्येही असाच अंतर्कलह निर्माण झाला आहे. मागच्या महिन्यामध्ये रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाने भाजपमध्ये प्रवेश केला. आता रविवारी जडेजाचे वडिल आणि बहिण काँग्रेसमध्ये शामील झाले आहेत. काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीमध्ये जडेजाचे वडिल अनिरुद्ध सिंग आणि बहिण नैनाबा जडेजा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

रवींद्र जडेजा जामनगरचा राहणारा आहे. जडेजाची पत्नी रिवाबाचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर तिला जामनगरमधून तिकीट मिळेल, अशा चर्चा होत्या. पण भाजपने सध्याच्या खासदार पूनम माडम यांनाच उमेदवारी दिली. गुजरातमध्ये एकूण २६ लोकसभा मतदारसंघ आहेत. २३ एप्रिलला एकाच टप्प्यात गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत.

ऑक्टोबर २०१८ मध्ये रिवाबा जडेजाची करणी सेनेची गुजरात महिला अध्यक्षपदी नेमणूक झाली होती. करणी सेनेनं संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटाचा हिंसक विरोध केला होता. मे २०१८ साली रिवाबा जडेजा चर्चेत आली होती. एका पोलीस कॉन्स्टेबलने रिवाबा जडेजाच्या कानशिलात लगावली होती. रिवाबा जडेजाच्या कारने कॉन्स्टेबलच्या बाईकला टक्कर दिली होती.

Read More