Norway Chess 2025: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला आणि पाच वेळा विश्वविजेता असलेला मॅग्नस कार्लसनने शुक्रवारी स्टॅव्हेंजर येथे झालेल्या नॉर्वे बुद्धिबळ 2025 स्पर्धेत विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश आणि फॅबियानो कारुआना यांना मागे टाकत विजय मिळवला. नॉर्वे बुद्धिबळाच्या अंतिम फेरीत, स्पर्धेत आघाडीवर असलेल्या कार्लसनला मागे टाकण्याच्या टार्गेटमध्ये, गुकेशने कारुआनाविरुद्ध एक चूक केली ज्यामुळे तो कार्लसन आणि अमेरिकन कारुआना यांच्या मागे तिसऱ्या स्थानावर राहिला. कार्लसन 10 फेऱ्यांमध्ये 16 गुणांसह अव्वल स्थानावर राहिला, कारुआन 15.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला तर गुकेश 14.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
विजयानंतर कार्लसन म्हणाला, "अशा दिवसानंतर आणि अशा स्पर्धेनंतर हा खूप मोठा दिलासा आहे. शेवटी माझे संघर्ष सार्थकी लागले. मी शेवटपर्यंत लढलो, मी यामुळे आनंदी आहे." तो क्लासिकल बुद्धिबळ खेळत राहील का? असे त्याला विचारले तेव्हा कार्लसन म्हणाला: "नक्कीच जास्त नाही. मी असे म्हणणार नाही की ही स्पर्धा माझी शेवटची स्पर्धा होती. मला बुद्धिबळाचे इतर प्रकार जास्त आवडतात."
अर्जुन एरिगाइसी विरुद्धच्या अंतिम सामन्यात, जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या बुद्धिबळपटू कार्लसनचे 15 गुण होते तर गुकेश 14.5गुण होते. कार्लसनपासून गुकेश फक्त अर्धा गुण मागे होता. गुकेश 12.5 गुणांसह जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या कारुआनाविरुद्ध खेळत होता. एका चुकीसोबत गुकेशने त्याचा सामना गमावला.
जेतेपदाच्या शर्यतीत चौथा खेळाडू 13 गुणांसह हिकारू नाकामुरा होता, ज्याने चीनच्या वेई यी सोबतचा सामना अनिर्णित राखला, ज्यामुळे त्याची जेतेपद जिंकण्याची शक्यता नसल्यात जमा झाली.
अर्जुन एरिगाईसीविरुद्ध, कार्लसनने शेवटच्या पाच फेऱ्यांमध्ये गेम बदलला आणि जिंकला. अशाप्रकारे तो चॅम्पियन बनला.