MI VS RCB : आयपीएल 2025 मध्ये सोमवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Mumbai Indians VS Royal Challengers Bengluru) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय मिळवून सामना जिंकला. हाई-स्कोरिंग सामन्यात आरसीबीने रोमांचक विजय मिळवला. हा आरसीबीचा यंदाच्या सीजनमधील तिसरा विजय ठरला. मात्र या विजयानंतर बीसीसीआयने आरसीबीच्या कर्णधारावर मोठी ऍक्शन घेतली आहे.
वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर आरसीबीला फलंदाजीसाठी आव्हान दिले. आरसीबीच्या फलंदाजांनी 20 ओव्हरमध्ये दमदार कामगिरी करून 5 विकेट गमावून 221 धावा केल्या. तसेच मुंबईला विजयासाठी 222 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पूर्ण करताना मुंबई इंडियन्सची नामुष्की झाली आणि 9 विकेट गमावून त्यांनी केवळ 209 धावा केल्याने त्यांचा 12 धावांनी पराभव झाला. मात्र या विजयानंतर स्लो ओव्हर रेटमुळे आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याच्यावर बीसीसीआयने कारवाई केली.
हेही वाचा : 'या' कॅचमुळे मुंबईने गमावली मॅच! फिल साल्ट-टिम डेव्हिडचं बाऊंड्रीजवळ जबरदस्त टीमवर्क; Viral Video पाहाच
मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार रजत पाटीदारवर 12 लाखांचा दंड लावण्यात आला. आयपीएलने मंगळवारी एक स्टेटमेंट जारी करत म्हटले की, 'या सीजनमध्ये पहिल्यांदाच रजत पाटीदार याला सदर प्रकरणात दोषी ठरवले गेले आहे. आयपीएल आचारसंहिता अनुच्छेद 2.2 नुसार रजत पाटीदार याला स्लो ओव्हर रेटच्या नियमात दोषी ठरवण्यात आले. यामुळे पाटीदार याला 12 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे'.
आयपीएल 2025 मध्ये आरसीबीने मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सना पराभूत करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. फक्त गुजरात टायटन्स विरुद्ध सामन्यात त्यांचा पराभव झालाय. मुंबईविरुद्धच्या विजयात कर्णधार रजत पाटीदारने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने 32 चेंडूत 64 धावा केल्या. ज्यात पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. त्याला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डही मिळाला.