Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL मुळे ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप हरली? क्रिकेट जगतात खळबळ; RCB कनेक्शन चर्चेत

Lost WTC Because Of IPL: दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभवाचा मोठा धक्का दिल्यानंतर आता या पराभवाचं खापर आयपीएलवर फोडलं जात आहे. नेमका काय आहे हा प्रकार जाणून घ्या.

IPL मुळे ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप हरली? क्रिकेट जगतात खळबळ; RCB कनेक्शन चर्चेत

Lost WTC Because Of IPL: जगभरामध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकणार अशी जोरदार चर्चा असतानाच दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत 27 वर्षानंतर आयसीसीच्या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाबद्दल या संघाचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची कारण मिमंसा करताना आता एकमेकांवर टीका होऊ लागली आहे. एका टीकेमध्ये तर ऑस्ट्रेलियाच्या या पराभवासाठी आयपीएल कारणीभूत असल्याचं सांकेतिक पद्धतीने सांगण्यात आलं आहे. 

व्यक्त केलं आश्चर्य

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप म्हणजेच डब्यूटीसीमध्ये पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसनने कठोर शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे. मिचेलने वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडवर निशाणा साधला आहे. जॉनसनने हेजलवुडने कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलआधी इंडियन प्रिमिअर लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य देण्यावरुन आश्चर्य व्यक्त केलं आहे.

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी

हेजलवुडने यंदाच्या आयपीएल पर्वामध्ये जेतेपद पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना उत्तम कामगिरी केली. हेजलवुडने 22 विकेट्स घेतल्या आणि अंतिम सामन्यात त्याने प्रियांश आर्याची विकेट घेतली. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या तणावमुळे आयपीएल एक आठवडा स्थगित करण्यात आल्यानंतर ते पुन्हा सुरु झालं तेव्हा अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात स्पर्धेसाठी परतले नाहीत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात हेजलवुडने दोन विकेट्स घेतल्या. त्याला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सने पराभव झाला.

...तर हा विचार योग्य नाही

"मागील काही वर्षांपासून हेजलवुडच्या प्रकृतीसंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. आयपीएल खेळण्यासाठी जाण्याच्या त्याच्या निर्णयामुळे राष्ट्रीय संघाकडून खेळताना त्याला खेळावर परिणाम झाल्याचं जाणवलं," असं जॉनसन म्हणाला. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि हेजलवुडसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दलही प्रश्न जॉनसनने उपस्थित केलेत. केवळ अॅशेजसाठी तुम्ही संघात आहात असा विचार करत असाल तर तो योग्य नाही. अशावेळेस तरुण खेळाडूंना भविष्याचा विचार करुन संधी दिली पाहिजे, असं जॉनसनने म्हटलं आहे.

या खेळाडूंना संधी द्या

जॉनसनने सॅम कॉनस्टास, जॉश इंग्लीश आणि स्कॉट बोलँडसारख्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन संघात संधी देण्यासंदर्भात भाष्य केलं. हे खेळाडू कायमच स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तयार असतात. वय काहीही असो काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा असेल तर संधी मिळाली पाहिजे, असं जॉनसनने म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचा पुढील दौरा हा वेस्ट इंडिजचा असून या दौऱ्यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा उत्तम वेळ निवड समितीकडे असल्याचं जॉनसन म्हणाला.

Read More