Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पोलिसांत आत्ताच हजर होणार नाही, पाहा शमीनं काय दिलंय कारण

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमी कोलकाता पोलिसांच्या चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नाही. 

पोलिसांत आत्ताच हजर होणार नाही, पाहा शमीनं काय दिलंय कारण

नवी दिल्ली : हसीन जहाँ प्रकरणात टीम इंडियाचा धुवाँधार बॉलर मोहम्मद शमी याच्या विरोधात कोलकताच्या लाल बाजार पोलिसांनी समन्स बजावलेत. शमीला या पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी (18 एप्रिल) दुपारी 2 वाजण्यापूर्वी उपस्थित राहायचे आदेश देण्यात आलेत. शमीच्या पत्नीनं केलेल्या बलात्कार आणि घरगुती हिंसेच्या आरोप प्रकरणात पोलीस शमी आणि त्याच्या भावाची चौकशी करणार आहेत. परंतु, मोहम्मद शमीनं मात्र कोलकाता पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी असमर्थता व्यक्त केलीय. मोहम्मद शमी आयपीएल 2018 मध्ये दिल्ली संघाकडून खेळतोय. आयपीएलमध्ये व्यस्त असल्यानं पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकणार नाही, असं कारण मोहम्मद शमीनं पोलिसांना दिलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमी कोलकाता पोलिसांच्या चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नाही. शमीनं आपल्या वकिलांकरवी लाल बाजार पोलिसांना चिठ्ठी पाठवलीय. यामध्ये, आयपीएल संपल्यानंतर आपण पोलिसांच्या चौकशीसाठी उपस्थित राहून आणि पूर्ण सहयोग करू, असं त्यानं या चिठ्ठीत म्हटलंय. 

शमीच्या वकिलांच्या माहितीनुसार, आयपीएलच्या बिझी शेड्युलमुळे शमीला आताच पोलिसांसमोर हजर होणं शक्य होणार नाही. आयपीएल संपल्यानंतर तो पोलिसांसमोर हजर होईल. 

शमीच्या नावे समन्स जारी

हसीन जहाँने मार्चमध्ये शमीविरोधात मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंसारखे आरोप लावले होते. दरम्यान, शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले. आता कोलकाता पोलिसांनी शमीच्या नावाने समन्स जारी केलेत. शमीवा कोलकाता पोलिसांसमोर बुधवारी १८ एप्रिलला दोन वाजण्याच्या आत हजर राहायचे आहे. पोलीस बलात्कार आणि घरगुती हिंसाचार प्रकरणात शमीची चौकशी करणार आहेत. 

हसीन जहाँने शमीवर अनेक गंभीर आरोप लावलेत. जहाँने शमीचा भाऊ हासिबवर बलात्काराचा आरोप केला होता. शमीसोबत त्याच्या भावालाही समन्स जारी कऱण्यात आलेत. शमीच्या उपस्थितीत त्याच्या भावाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप हसीन जहाँने केला होता. मीडियासमोर दिलेल्या माहितीत तिने ही बाब सांगितली होती. शमीचा भाऊ बलात्कार करत होता मात्र शमीने कोणतीही मदत केली नाही.

हसीन जहाँच्या तक्रारीनंतर कोलकाता पोलिसांनी शमीविरोधात भारतीय दंड विधानानुासर कलम 498A/323/307/376/ 505/ 328/34 अंतर्गत केस दाखल केलीय. दरम्यान हसीनने याआधी शमीकडे भत्ता देण्याची मागणी केलीये. हसीन जहाँच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनने मोहम्मद शमी, त्याची आई, मोठा भाऊ आणि वहिनीविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केलीये. तसेच हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केलीये. हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी. 

 

Read More