Mumbai Crime News: मुंबई ज्या काही मोजक्या ठिकाणांच्या नावांवरुन ओळखली जाते त्यापैकी एक म्हणजे वानखेडे स्टेडियम! भारताने 2011 साली जिंकलेला एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्डकप असो किंवा सचिन तेंडुलकरचा शेवटचा अंतरराष्ट्रीय सामना असो या मैदानाने चाहत्यांना फार कमी वेळा निराश केलं आहे. अनेक कडू-गोड आठवणींचं साक्षीदार असलेलं हे मैदान सध्या एका फारच विचित्र कारणाने चर्चेत आहे. या मैदानाच्या दुसऱ्या मजल्यावर लाखो रुपयांची चोरी झाल्याचं समोर आलं आहे.
मैदानातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बीसीसीआयच्या अधिकृत स्टोअरमधून आयपीएल खेळाडूंच्या एकूण 261 जर्सीं चोरी गेल्या आहेत. या प्रकरणी सुरक्षा व्यवस्थापक फारुख असलम खानविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही घटना 13 जून 2025 रोजी घडली होती. याप्रकरणी 17 जुलै 2025 रोजी अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली होती. बीसीसीआयच्या कार्यालयात काम करणारे हेमांग भारतकुमार अमीन (44) हे महिम येथील रहिवाशी असून त्यांच्या तक्रारीनुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे.
अमीन यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, मीरारोडमधील गौरव एक्सेलन्सी येथे राहणारा 46 वर्षीय आरोपी फरुख असलम खान बीसीसीआयच्या कार्यालयात सुरक्षा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. त्याने बीसीसीआयच्याच्या अधिकृत स्टोअरमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करून मुंबई इंडियन, दिल्ली कॅपिटल, सन रायझर्स हैद्राबाद, कोलकाता नाईट राईडर्स, गुजरात, राजस्थान व चेन्नई अशा विविध संघांच्या मिळून 261 जर्सी चोरल्या. या सर्व जर्सींची किंमत सहा लाख 52 हजार रुपये इतकी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तक्रारीच्या आधारे मरीन ड्राइव्ह पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण आणि इतर संबंधित पुरावे तपासले जात आहेत. याप्रकरणी इतर आरोपींच्या सहभागाबाबत पोलीस तपास करत आहेत. आरोपींनी इतरही काही गोष्टींवर याआधाही हात साफ केला आहे का? त्यांना इतर कोणी काही मदत केली आहे का? यासंदर्भातील चौकशी सध्या पोलीस करत आहेत. या घटनेला दीड महिन्यांहून अधिक काळ उलटला असल्याने पोलिसांना अधिक मेहनत घेऊन सर्व पुरावे गोळा करावे लागणार आहेत.