भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविक यांचा संसार आता भूतकाळात जमा झाला असला, तरी त्यांचं नाव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. एक जुना व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामुळं चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे की, हे दोघं पुन्हा एकत्र आले आहेत का?
2020 मध्ये लग्न झाल्यानंतर हार्दिक आणि नताशा हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत राहिले होते. त्यांची केमिस्ट्री फॅन्सना खूप भावली होती. मात्र, जुलै 2024 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि अधिकृतरित्या घटस्फोट घेतला. त्यानंतर दोघंही वेगवेगळ्या वाटेवर निघून गेले.
मात्र अलीकडेच, एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये हार्दिक आणि नताशा एकत्र दिसत आहेत. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित झाला की, खरंच नताशा पुन्हा हार्दिकच्या घरी गेली होती का? काहींनी अंदाज लावला की दोघं पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.
हा व्हिडीओ सध्याच्या काळातला नसून एप्रिल 2021 मधील आहे. त्या व्हिडीओत हार्दिक नताशाची ओळख करून देतो, नंतर स्वतःचा, आणि मग कॅमेरा फिरवून टेबलवर जेवणावर ताव मारणाऱ्या कावळ्यांना दाखवतो. हार्दिक हसत म्हणतो, "ही नट्स आहे, मी आहे, हे आमचं गार्डन आहे… आणि इथे पार्टी चालू आहे!"
हा व्हिडीओ मूळात हार्दिकच्या अधिकृत अकाउंटवर नव्हता, तर तो एक पैरोडी इंस्टाग्राम अकाउंट होता – @hardikpandyaa63 – ज्यावर तो 25 जून 2025 रोजी शेअर करण्यात आला. मूळ व्हिडीओ ज्या अकाउंटवर होता, तो तिथून आता हटवण्यात आला आहे.
हार्दिक आणि नताशामधील हा व्हिडीओ जुनाच आहे. तो नव्याने शेअर झाल्यामुळे लोकांनी चुकीचे अनुमान लावले. खरंतर , दोघांनीही घटस्फोटानंतर असा कोणताही व्हिडीओ स्वतःहून शेअर केलेला नाही.