Radhika Yadav Murder Case : राष्ट्रीय स्तरावरील स्टार टेनिसपटू राधिका यादवच्या (Radhika Yadav) हत्येच्या बातमीने क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली. गुरुवारी 25 वर्षीय राधिकावर राहत्या घरात तिच्याच वडिलांनी ३ गोळ्या झाडल्या. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं परंतू तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून या घटनेबाबत पुढील चौकशी सुरु आहे. दरम्यान राधिकाच्या वडिलांनी आपल्याच मुलीवर गोळ्या का झाडल्या यामागचं धक्कादायक कारण समोर आल्यावर लोकं हळहळ व्यक्त करत आहेत. असे असताना ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
राधिकाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिचे वडील दीपक यादव यांना ताब्यात घेतले. राधिका आपल्या कुटुंबासोबत गुरुग्राममध्ये वास्तव्यास होती. पोलिसांनी सांगितल्यानुसार, 'राधिका यादव ही एक राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू होती. तिने या खेळात अनेक मेडल सुद्धा जिंकले. काही महिन्यांपूर्वी तिच्या खांद्याला दुखापत झाली, ज्यामुळे तिने खेळणं बंद केलं होतं. खेळ सोडल्यावर राधिकाने वजीराबाद गावात लहान मुलांना टेनिस खेळ शिकवण्यासाठी एक अकॅडमी सुरु केली. पण राधिकाचे वडील याच्या विरोधात होता. राधिकाने तिच्या वडिलांना याबाबत बऱ्याचदा समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या वडिलांचं म्हणणं होतं की ते जेव्हा कधी घराबाहेर पडतात तेव्हा गावकरी त्यांना 'मुलीची कमाई खातोय' असे टोमणे मारतात. ज्यामुळे राधिकाचे वडील खूप त्रासले होते. ज्यामुळे मागील 15 दिवसांपासून दररोज घरी बाप लेकीची भांडण होत होती. गुरुवारी दुपारी राधिका जेव्हा स्वयंपाक घरात जेवण बनवत होती तेव्हा तिच्या वडिलांनी रागाच्या भरात मुलीच्या पाठीत तीन गोळ्या झाडल्या. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला'. राधिकाच्या मृत्यूचं कारण समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला.
हेही वाचा : T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पहिल्यांदा क्वालिफाय झाला 'हा' संघ, भारत - ऑस्ट्रेलियाला देणार टक्कर
राधिकाच्या हत्याप्रकरणावर नीरज चोप्रा म्हणाला की, 'मी यापूर्वी सुद्धा म्हणत होतो की, आपल्याकडे हरियाणाच्या काही अतिशय उत्कृष्ट महिला ऍथलिट आहेत ज्या देशासाठी खूप चांगली कामगिरी करतायत. कुटुंबात तुम्हाला एकमेकांचं समर्थन करायला हवं. तसेच जी महिला ऍथलिट चांगलं करतेय तिला आदर्श मानायला हवं आणि तिचं अनुसरण करायला हवं'. नीरज चोप्रा हा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. नीरज चोप्रा हा सुद्धा हरियाणाचा आहे.