IPL 2025 : भारत - पाकिस्तान तणावामुळे एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेली आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धा 17 मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. आयपीएल स्थगित करण्यात आली असल्याने संघांमधील काही विदेशी खेळाडू त्यांच्या मायदेशात परतले होते. त्यापैकी काहीजण भारतात परतत आहेत तर काहीजण पुन्हा सामने खेळण्यासाठी भारतात परतणार नाहीत. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्स आणि बीसीसीआयवर फॅन्स भडकले असून ते दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल 2025 मधून बॅन करण्यात यावं अशी मागणी करत आहेत. सध्या एक्स या सोशल मीडिया साईटवर #BoycottDelhiCapitals हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.
दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल 2025 मधून बॅन करण्यात यावं अशी मागणी करण्यामागे कारण आहे 'बांगलादेशी खेळाडू'. दिल्ली कॅपिटल्सचा जेक फ्रेझर-मॅकगर्क हा खेळाडू आयपीएल स्थगित झाल्याने त्याच्या मायदेशी म्हणजेच ऑस्ट्रेलियामध्ये परतला आहे. जेक फ्रेझर-मॅकगर्क हा 23 वर्षांचा खेळाडू असून त्याची आयपीएलमध्ये दमदार कामगिरी सुरूच होती. मात्र धर्मशाला स्टेडियमवर दिल्ली - पंजाब सामना सुरु असताना करण्यात आलेलं ब्लॅक आउट आणि त्यानंतर स्थगित करण्यात आलेली आयपीएल यामुळे मायदेशी परतलेला जेक फ्रेझर-मॅकगर्क हा पुन्हा भारतात येणार नाहीये. ज्यामुळे आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांना तो मुकला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने 14 मे रोजी बांगलादेशी क्रिकेटर मुस्तफिझूर रहमान याला जेक फ्रेझर-मॅकगर्क याची रिप्लेसमेंट म्हणून आपल्या सोबत उर्वरित आयपीएल 2025 च्या सीजनसाठी करारबद्ध केले. मुस्तफिझूर रहमान हा वेगवान गोलंदाज आहे. मुस्तफिझूर रहमान हा 2 वर्षांनी दिल्ली संघात परतत आहे, यापूर्वी तो 2022 आणि 2023 या सीजनमध्ये सुद्धा त्यांचा भाग होता. मात्र बांगलादेश खेळाडूला दिल्ली फ्रेंचायझीने आपल्या संघात का घेतलं असा प्रश्न विचारतायत. एका युजरने लिहिलं की, 'दिल्ली कॅपिटल्सचे हे पाऊल लज्जास्पद आहे. बांगलादेशात हिंदूंची कत्तल होत असताना आणि इतर लोक एकजुटीने उभे असताना, त्यांनी मुस्तफिजुर रहमान याला करारबद्ध केलं. अशा देशविरोधी मानसिकतेला नाकारण्याची वेळ आली आहे'. बातमी लिहीपर्यंत #BoycottDelhiCapitals या हॅशटॅगचा वापर करून जवळपास 22 हजार पोस्ट एक्स प्लॅटफॉर्मवर करण्यात आल्या होत्या.
Mustafizur Rahman is back in after two years!
Delhi Capitals (DelhiCapitals) May 14, 2025
He replaces Jake Fraser-McGurk who is unavailable for the rest of the season. pic.twitter.com/gwJ1KHyTCH
हेही वाचा : 'गंदी बाते करनी चाहिए...' मुलाखतीत रोहित शर्मा हे काय बोलून गेला? Video होतोय व्हायरल
बांगलादेशातील जवळपास 12 खेळाडूंनी यंदाच्या मेगा ऑक्शनसाठी नाव नोंदवलं होतं. मात्र यापैकी फक्त 2 खेळाडूंची नाव ही प्रत्यक्ष ऑक्शनमध्ये घेण्यात आली आणि त्यापैकी एकाही खेळाडूवर 10 संघांपैकी एकानेही बोली लावली नव्हती. त्यामुळे ते खेळाडू अनसोल्ड ठरले. बांग्लादेशच्या लिटन दास, तस्कीन अहमद, शाकिब अल हसन, मेहदी हसन मिराज, शोरिफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, मुस्ताफिजुर रहमान आणि रिशाद हुसैन या 12 खेळाडूंनी नाव नोंदवली होती. यापैकी केवळ मुस्ताफिजुर रहमान आणि रिशाद हुसैन यांना प्रत्यक्ष ऑक्शनसाठी निवडण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर कोणीही बोली लावली नव्हती. त्यानंतर पाकिस्तान प्रमाणे आयपीएलमधील संघांनी बांगलादेशी खेळाडूंवर सुद्धा बंदी घातली की काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
आतापर्यंत आयपीएल सामन्याचे निकाल पहिले तर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स +0. 793 नेट रनरेट आणि 16 पॉईंट्स सह पहिल्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ +0. 482 नेट रनरेट दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहे. तर चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये मोठी चुरस असून मुंबईने आतापर्यंत 12 पैकी 7 तर दिल्लीने 11 पैकी 6 सामने जिंकलेत तर त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. मुंबईकडे सध्या 14 पॉईंट्स तर दिल्लीकडे 13 पॉईंट्स आहेत. तसेच त्यांच्या नेट रनरेटमध्ये सुद्धा फार अंतर नाही. तेव्हा दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान संपल्यास मुंबईला प्लेऑफचा मार्ग मोकळा होऊ शकतो.