Shane Bond on Jasprit Bumrah Injury: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा मागील काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. बुमराहला बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024 -25 च्या शेवटच्या सामन्यादरम्यान पाठीला दुखापत झाली होती, त्यातून तो रिकव्हर न झाल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) खेळण्याची त्याची संधी सुद्धा हुकली. बुमराहच्या पाठीच्या दुखापतीबाबत दिग्गज खेळाडू शेन बॉन्डने (Shane Bond) आता वॉर्निंग दिली आहे.
बुमराह त्याच्या करिअरमधील मागील काही वर्ष पाठीच्या समस्येने त्रस्त होता. 2022-23 दरम्यान सुद्धा त्याला बराचकाळ या दुखापतीमुळे मैदानाच्या बाहेर बसावे लागले होते. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने पुनरागमन केले आणि आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुद्धा गोलंदाजीत उत्तम परफॉर्म करून त्याने भारताच्या विजयात मोठं योगदान दिलं. परंतू पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीमधून दुखापतीमुळे बुमराहला बाहेर रहावे लागले. बुमराह कधी मैदानावर परतणार याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या बंगळुरूच्या रिहॅब सेंटरमध्ये त्याने सरावाला सुरुवात केली असून एप्रिल पासून तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सामने खेळताना दिसू शकतो.
हेही वाचा : IPL 2025 च्या सुरुवातीच्या मॅचमधून बाहेर राहणार 3 खेळाडू, मुंबई इंडियन्समधील दोघांचा समावेश
क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू शेन बॉण्डने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत त्याचं मत मांडलं. शेन बॉण्डचं करिअर सुद्धा दुखापतीमुळे प्रभावित झालं होतं. त्यामुळे शेनचं म्हणणं होतं की बुमराहला एकच दुखापत सारखी होत असते आणि हे त्याच्या करिअरसाठी रेड अलर्ट सारखं आहे. म्हणजेच यामुळे बुमराहचं करिअर लवकर संपू शकतं. त्याच्या काळात वेगवान गोलंदाज शेन बॉण्ड हा वारंवार दुखापतीच्या कारणामुळे केवळ 18 टेस्ट, 82 वनडे आणि 20 टी20 सामने खेळू शकला होता. शेन बॉण्डने मुंबई इंडियन्स सोबत असताना बुमराह सोबत सुद्धा काम केलं आहे. परंतू आयपीएल २०२४ मध्ये शेन बॉण्ड हा राजस्थान रॉयल्स संघाशी जोडला गेला.
शेन बॉण्डने ESPNcricinfo सोबत बोलताना म्हटले की, 'ते म्हणू शकतात, पहा, हे एकूण चार किंवा तीन टेस्ट सामने आहेत. जर तो तंदुरुस्त असेल तर तो सर्व फॉरमॅटमध्ये खेळू शकतो. परंतु तसं नसेल तर अवघड आहे कारण तो भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे, परंतु जर त्याला त्याच ठिकाणी आणखी एक दुखापत झाली तर त्याचे करिअर संपू शकेल. कारण मला माहित नाही आपण त्या ठिकाणी पुन्हा शस्त्रक्रिया करू शकतो की नाही'.