Asia Cup 2025 : आशिया कप 2025 हॉकी स्पर्धेचं आयोजन यंदा 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहारच्या राजगीर येथे होणार आहे. यंदाच्या हॉकी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानसह (India and Pakistan) एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. पण सध्या माहिती समोर येतेय की पाकिस्तान हॉकी संघाने भारतात येण्यास नकार दिलाय, त्यामुळे आता हॉकी टीम इंडियाने दुसऱ्या देशाला आशिया कपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिलंय. जो संघ आशिया कप जिंकेल तो नेदरलँड आणि बेल्जीयममध्ये होणाऱ्या हॉकी वर्ल्ड कप 2026 साठी क्वालिफाय करेल.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांना ठार केल्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक ताणले गेले आहेत. याचा प्रत्येक क्षेत्राप्रमाणे खेळ जगतात सुद्धा प्रभाव पडला. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियन्स लेजेंड्स स्पर्धेत भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार देत थेट स्पर्धेतून माघार घेतली. पाकिस्तान संघ भारतात येऊन सामने खेळण्यास तयार नाही म्हणून सप्टेंबर महिन्यात होणारा आशिया कप 2025 हा न्यूट्रल वेन्यूवर खेळवण्यात येणार असल्याचे ठरवले. आशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाणार आहे.
हॉकी इंडियाच्या एका अधिकाऱ्याने 'द हिंदू' ला सांगितलं की, 'भारत सरकार पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिजा देण्यास तयार होती, परंतू सुरक्षेच्या कारणांचा हवाला देतं पाकिस्तान हॉकी महासंघाने भारतात येण्यास नकार दिला".
पाकिस्तानच्या संघाने आशिया कप हॉकीमधून माघार घेतल्यामुळे हॉकी इंडियाने बांगलादेशला आमंत्रण पाठवलं आहे. अधिकाऱ्याने 'द हिंदू' ला सांगितलं, 'पीएचएफ (पाकिस्तान हॉकी फेडरेशन) ने बुधवारी आशियाई हॉकी महासंघाला पत्र लिहीत म्हटले, सुरक्षेच्या कारणांमुळे पाकिस्तानचा संघ हा आशिया कप हॉकीमध्ये सहभाग घेणार नाही. त्यामुळे आता आम्ही बांगलादेशला या स्पर्धेसाठी आमंत्रण दिलं आहे'.
1. आशिया कप 2025 हॉकी स्पर्धेचे आयोजन कधी आणि कुठे होणार आहे?
आशिया कप 2025 हॉकी स्पर्धा 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 दरम्यान बिहारच्या राजगीर येथे होणार आहे.
2. पाकिस्तान हॉकी संघाने आशिया कप 2025 मधून माघार का घेतली?
पाकिस्तान हॉकी महासंघाने (PHF) सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत भारतात येण्यास नकार दिला आहे. त्यांनी आशियाई हॉकी महासंघाला पत्र लिहून याबाबत कळवले आहे.
3. आशिया कप हॉकीच्या इतिहासात कोणते संघ यशस्वी ठरले आहेत?
दक्षिण कोरियाने सर्वाधिक 5 वेळा (1994, 1999, 2009, 2013, 2022) आशिया कप जिंकला आहे, तर भारत (2003, 2007, 2017) आणि पाकिस्तान (1982, 1985, 1989) यांनी प्रत्येकी 3 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे