Team India Won T20 World Cup 2024 One Year Ago On 29trh June: आजच्याच दिवशी एक वर्षांपूर्वी टीम इंडियाच्या कोट्यवधी चाहत्यांच्या स्वप्नाला वास्तवाची किनार मिळाली होती. 29 जून 2024 रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषक जिंकत 17 वर्षांची प्रतिक्षा संपवली. बारबाडोसच्या मैदानावर भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप उचलला होता. 2007 मध्ये एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला T20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी पुन्हा एकदा ट्रॉफी भारताच्या नावावर करत रोहितच्या टीमने इतिहास रचला. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत ICC चषक जिंकण्यात अपयशी ठरत होता. रोहित शर्मा याच काळात T20 वर्ल्ड कप 2022 आणि वनडे वर्ल्ड कप 2023 जवळून हरवून बसला होता. मात्र 2024 च्या अंतिम सामन्यात त्याने ‘कूल कॅप्टन’ची भूमिका लाजवाब निभावत T20 विश्वविजेता बनून दाखवले. या विजयाने 11 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आणि त्याचबरोबर रोहितने टीकाकारांनाही सडेतोड उत्तर दिलं.
भारताची सुरुवात खराब झाली होती. पहिल्या 5 षटकांत 3 विकेट्स 34 धावांत गमावलेल्या भारताला संकटातून बाहेर काढण्याचं काम केलं विराट कोहली आणि अक्षर पटेलने. कोहलीने 59 चेंडूंमध्ये 76 तर अक्षरने 31 चेंडूंमध्ये 47 धावांची मोलाची खेळी केली.
176 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनेही जोरदार टक्कर दिली. ट्रिस्टन स्टब्स आणि क्लासेनने आक्रमक फटकेबाजी करत आफ्रिकेची आशा जिवंत ठेवली. पण शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने जबरदस्त गोलंदाजी करत सामना भारताच्या बाजूने फिरवला.
डेव्हिड मिलरच्या फटकेबाजीचा धोका असताना अंतिम षटकात बुमराहच्या चेंडूवर सूर्या यादवने लॉन्ग-ऑफवर घेतलेला ‘रिले झेल’ संपूर्ण सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्या क्षणाने सामना भारताच्या ताब्यात गेला आणि अखेर ७ धावांनी विजय मिळाला.
या विजयानंतर विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजानेही T20 फॉरमॅटला रामराम केला.
This Day. Last Year. Infinite Memories
— BCCI (@BCCI) June 28, 2025
#TeamIndia pic.twitter.com/pogI5bjMjM
2023 साली अहमदाबादच्या मैदानावर अपूर्ण राहिलेलं स्वप्न, बारबाडोसच्या मैदानावर पूर्ण झालं. देशभरातील टीव्हीसमोर डोळे लावून बसलेल्या चाहत्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. रोहितचा संयम, विराटची बॅटिंग, हार्दिकचा आत्मविश्वास आणि सूर्या यादवचा झेल, या सर्वांच्या एकत्रित कामगिरीमुळे भारताने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात आपलं वर्चस्व सिद्ध केलं.