Pakistani Cricketer On Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यासंदर्भात देशभरातून हळहळ व्यक्त होत असतानाच हा हल्ला पाकिस्तानने घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणामध्ये अद्याप सरकारकडून हल्ला कोणी केला याबद्दल कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. याचदरम्यान पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने या हल्ल्यात हिंदूंना लक्ष्य करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं आहे.
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. हिंदूंना लक्ष्य करण्यात आल्याच्या मुद्द्याचा उल्लेख करत या हल्ल्याविरोधात दानिश कनेरियाने आवाज उठवला आहे. दानिश कनेरियाने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या बाजूला त्याची नवविवाहित वधू बसल्याचा व्हायरल फोटो पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
"पहगाममध्ये अजून एक घातक हल्ला झाला. बांगलादेशपासून बंगाल ते काश्मीरपर्यंत सारखीच विचारसरणी असून हिंदूंना लक्ष्य केलं जात आहे. मात्र धर्मनिरपेक्ष लोक आणि न्याय व्यवस्था हल्लेखोरांना मागास अल्पसंख्यांक असल्याचं मानते," अशी कॅप्शन कनेरियाने या पोस्टला दिली आहे. पोस्टच्या शेवटी त्याने, "पीडितांना न्याय मिळायला हवा," असंही म्हटलं आहे.
Another brutal attack in Pahalgam. From Bangladesh to Bengal to Kashmir, the same mindset targets Hindus. But 'seculars' and judiciary insist the attackers are 'oppressed minorities.' Victims deserve justice. pic.twitter.com/GtA5WpFjIr
— Danish Kaneria (@DanishKaneria61) April 22, 2025
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करण्याआधी त्यांचा धर्म कोणात अशी विचारणा केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी महिलेनं केला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना 'कलमा' (इस्लामिक धार्मिक मंत्र) म्हणायला सांगितलं. मात्र पर्यटकांचे आयडी तपासल्यानंतर त्यांच्यावर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यानंतर या ठिकाणी एकच गोंधळ उडाला आणि पर्यटक सैरावैरा पळू लागले. प्रत्यक्षदर्शिंनी त्यांच्यासमोरच त्यांच्या नातेवाईकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याची आपभिती सांगितली.
राज ठाकरेंनीही घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच धर्म विचारुन गोळीबार केल्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. "एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला. ही तुमची मुजोरी? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ. या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले आहेत.