Shaheen Afridi Hit For 26 Runs 4 Sixes In Over: न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेमधील दुसरा सामनाही मंगळवारी सहज जिंकला. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये न्यूझीलंडने 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. यजमान संघाने पाकिस्तानला 6 विकेट्स राखून पराभूत केलं. या सामन्यात पावसाचा व्यत्ययही आल्याने प्रत्येकी 15 ओव्हरचा सामना खेळवण्यात आला धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दमदार विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 15 ओव्हरमध्ये 9 विकेट्सच्या मोबदल्यात 135 धावा केल्या. न्यूझीलंडने ही धावसंख्या सहज गाठली. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही पाकिस्तानी गोलंदाजांनी कच खाल्ली आणि ते न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर निष्प्रभ ठरले. विशेष म्हणजे पाकिस्तानी क्रिकेट संघाचा आघाडीचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीचीही न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पिसं काढली.
शाहीन शाह आफ्रिदीने 3 ओव्हरमध्ये 31 धावा दिल्या. यापैकी 26 धावा एकाच ओव्हरमध्ये आल्या. न्यूझीलंडचा विकेटकीपर फलंदाज टीम शेफर्टने शाहीन शाह आफ्रिदीची दमदार धुलाई केल्याचं दिसून आलं. एकाच ओव्हरमध्ये टीमने शाहीन आफ्रिदीला चार षटकार लगावले. यापैकी एक षटकार तर तब्बल 119 मीटरचा होता. सामन्यातील या तिसऱ्या ओव्हरनंतर न्यूझीलंडचा स्कोअर 18 बॉलमध्ये नाबाद 44 इतकी होती. तुम्हीच पाहा टीमने तिसऱ्या ओव्हरमध्ये शाहीनच्या गोलंदाजीवर केलेली ही फटकेबाजी...
— FanCode (@FanCode) March 18, 2025
Tim Seifert took Shaheen Afridi to the cleaners in his second over, smashing four sixes in it #NZvPAK pic.twitter.com/F5nFqmo7G6
सामान्यातील पराभावानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अघाने पाकिस्तानला जिंकायचं असेल तर आमच्या फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये उत्तम फलंदाजी करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. "पहिल्या सामन्यापेक्षा हा सामना नक्कीच जास्त चांगला झाला. आम्ही अधिक चांगली फलंदाजी केली. आमची फिल्डींगही उत्तम होती. गोलंदाजीही बऱ्याचश्या प्रमाणात बरी झाली. आम्हाला या मैदानांवर चेंडू किती उसळी घेतो हे समजून घ्यावं लागणार आहे. आम्ही पॉवर प्लेनंतर चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी करताना पॉवरप्लेचा अधिक चांगला वापर करुन घेता आला पाहिजे. तसेच पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीमध्येही अधिक सुधारणेला वाव आहे," असं पाकिस्तानी कर्णधार म्हणाला.
0-2 ने पिछाडीवर पडलेल्या पाकिस्तानला आता या मालिकेत एकही सामना गमावता येणार नाही. तसं झालं तर त्यांना मालिका गमावावी लागेल. आधीच चॅम्पियन्स ट्रॉफीमधून लवकर बाहेर पडल्याने पाकिस्तानवर टीका होत असताना आता टी-20 मध्येही संघाची सुमार कामगिरी चिंतेत भर टाकणारी आहे.