Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

इंग्लंडमध्ये क्रिकेटपटू अटकेत, बलात्काराच्या आरोपावरून PCBची तातडीची कारवाई

Haider Ali: पाकिस्तान क्रिकेट एका नवीन वादामुळे बदनाम होत आहे. तरुण फलंदाज हैदर अलीला बलात्काराच्या आरोपाखाली इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली.  

इंग्लंडमध्ये क्रिकेटपटू अटकेत, बलात्काराच्या आरोपावरून PCBची तातडीची कारवाई

Pakistan Cricketer Arrested In UK Over Rape Allegations: पाकिस्तान क्रिकेट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. तरुण क्रिकेटपटू हैदर अली याला इंग्लंडमध्ये बलात्काराच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्याच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे. ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी अटकेची आणि त्यानंतर जामिनावर सुटकेची पुष्टी केली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत हैदरचा पासपोर्ट जप्त ठेवण्यात आला आहे. ही घटना अलीकडेच संपलेल्या पाकिस्तान ‘शाहीन’ संघाच्या इंग्लंड दौऱ्यात घडल्याची माहिती समोर आली आहे. 24 वर्षीय हैदर अली पाकिस्तान ‘ए’ संघाचा भाग होता. PCB ने त्याला चौकशी पूर्ण होईपर्यंत संघातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला असून, इंग्लंडमध्ये स्वतंत्र चौकशीही केली जाणार आहे.

पोलिसांचा खुलासा

ग्रेटर मँचेस्टर पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे, “आम्ही 24 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. 23 जुलै 2025 रोजी मँचेस्टरमधील एका ठिकाणी ही घटना घडल्याचा आरोप आहे. सध्या तो जामिनावर असून तपास सुरू आहे.” इंग्लंड पोलिसांनी तपासाच्या या टप्प्यावर खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही.

अटक कुठे झाली?

‘टेलिकॉम एशिया स्पोर्ट्स’च्या माहितीनुसार, शाहीन संघाचा MCC विरुद्ध सामना सुरू असताना बेकेनहॅम मैदानावरून हैदर अलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. सूत्रांच्या मते, हा प्रकार पाकिस्तान वंशाच्या एका मुलीशी संबंधित आहे. जामिनावर सुटकेपूर्वी पोलिसांनी हैदरचा पासपोर्ट जप्त केला.

PCBची भूमिका काय?

PCB च्या प्रवक्त्याने सांगितले, “या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही हैदरला निलंबित केले आहे. तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि इंग्लंडमध्ये स्वतंत्र कारवाई करू. हैदरला कायदेशीर मदतही पुरवली जाईल.”

शाहीनचा दौरा

शाहीन संघाचा इंग्लंड दौरा 17 जुलैला सुरू होऊन 6 ऑगस्टला संपला. या दरम्यान तीन दिवसांचे दोन सामन्यांची मालिका ड्रॉ झाली, तर वनडे मालिका शाहीनने 2-1 ने जिंकली. दौऱ्यानंतर कर्णधार सउद शकील आणि हैदर अलीसह काही खेळाडू इंग्लंडमध्येच थांबले होते.

हैदर अलीचा क्रिकेट प्रवास कसा आहे?

हैदर अलीने 2020 मध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने 2 वनडे आणि 35 टी-20 सामन्यांत खेळ केला आहे. यापूर्वीही तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.  2021 च्या पाकिस्तान सुपर लीगदरम्यान कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याला निलंबनाला सामोरे जावे लागले होते.

FAQ

प्र. 1 : हैदर अली कोण आहे?
उ. हैदर अली हा पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून तो उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो.

प्र. 2 : हैदर अलीच्या कारकिर्दीत यापूर्वी वाद झाले आहेत का?
उ. होय, 2021 च्या पाकिस्तान सुपर लीगदरम्यान कोविड-19 प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यामुळे त्याला निलंबनाला सामोरे जावे लागले होते.

प्र. 3 : हैदर अली कोणत्या संघासाठी खेळतो?
उ. तो पाकिस्तान राष्ट्रीय संघाबरोबरच पाकिस्तान ‘ए’ संघासाठी आणि विविध स्थानिक/फ्रँचायझी संघांसाठी खेळतो.

Read More