Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद यंदा पाकिस्तानाला देण्यात आले होते. त्यानिमित्ताने तब्बल 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. पाकिस्तानची अर्थव्यवस्थेची हालत यापूर्वीच नाजूक होती. मात्र या टूर्नामेंटचे आयोजन करण्यासाठी झालेल्या खर्चामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला अजूनच धक्का बसला. रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) आयोजनात पाकिस्तानचा एवढा पैसे खर्च झाला की तेवढ्या पैशात ते जगातील सर्वात महागडा फायटर जेट एक F-35 खरेदी करू शकले असते.
रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तब्बल 85 मिलियन अमेरिकी डॉलर खर्च केले. जे भारतीय रुपयांमध्ये जवळपास 869 कोटी रुपये होतात. परंतु महत्वाची गोष्ट ही की संपूर्ण टूर्नामेंटवर 869 कोटी रुपये खर्च करूनही पाकिस्तानचा क्रिकेट संघ हा चॅम्पियन्स ट्रॉफीचे फक्त 2 सामने खेळू शकला. तर एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लाहोरमध्ये खेळवला गेला. यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला. तर दुसरा सामना दुबईत भारताविरुद्ध पार पडला, यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. तर ग्रुप स्टेजमधील बांगलादेश विरुद्ध तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला त्यासोबतच पाकिस्तानचा संघ अवघे दोन सामने खेळून टूर्नामेंटमधून बाहेर पडला.
हेही वाचा : विराटनंतर टीम इंडियाचा अजून एक क्रिकेटर BCCI वर भडकला, IPL च्या 'या' नियमाचा केला विरोध
टेलीग्राफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनासाठी निवडलेल्या रावलपिंडी, लाहौर आणि कराची या मैदानात अपग्रेड करण्यासाठी जवळपास 18 बिलियन पाकिस्तानी रुपये (जवळपास 58 मिलियन डॉलर) रुपये खर्च केले होते. अपग्रेड करण्यासाठी लागलेली किंमत हे जवळपास त्यांच्या बजेटपेक्षा 50 टक्के जास्त होती. नंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही कार्यक्रमाच्या तयारीसाठी US$40 दशलक्ष खर्च केल्याची माहिती आहे. मात्र त्यातून त्यांना अवघ्या काही रुपयांचा नफा झाला. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला होस्टिंग फीच्या नावाखाली फक्त 6 मिलियन अमेरिकी डॉलर मिळाले होते. मात्र तिकीट विक्री आणि प्रायोजकत्वाच्या बाबतीत झालेली कमाई मात्र अतिशय कमी होती. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केल्यामुळे PCB चे जवळपास 85 मिलियन डॉलरचे नुकसान झाल्याचे रिपोर्टमधून समोर आले आहे.
पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यावर लगेचच एक मोठं पाऊल उचललं. यानुसार देशांतर्गत क्रिकेट सामन्याच्या मॅच फीमध्ये जवळपास 90 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी नॅशनल टी 20 चॅम्पियनशिपमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची मॅच फी एक लाख रुपये प्रति सामन्याने कमी करून 10 हजार रुपये प्रति सामना एवढी केली. रिजर्व खेळाडूंना प्रति सामना 5 हजार रुपये मिळतील. ही स्पर्धा 14 मार्च रोजी सुरु होणार आहे. फक्त नॅशनल टी 20 चॅम्पियनशिपवरच नाही तर देशांतर्गत क्रिकेटच्या विकासावरही करण्यात येत असलेल्या खर्चात पीसीबी कपात करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मॅच फी मध्ये 90 टक्के कपात झाल्यामुळे खेळाडूंच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पाकिस्तानच्या मीडियानुसार, 'पीसीबीने काही दिवसांपूर्वीच अधिकृत घोषणा केल्या शिवाय खेळाडूंची मॅच फी 40,000 रुपयांवरून 10,000 रुपये केलं होतं. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवीने हस्तक्षेप करून हा निर्णय रद्द केला. तसेच बोर्डाला देशांतर्गत क्रिकेट विभागाच्या बाबतीत लक्ष द्यायचे निर्देश दिले आहेत. देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना सुद्धा यापूर्वी 5 स्टार किंवा 4 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जायची. मात्र आता खेळाडूंची व्यवस्था स्वस्त हॉटेलमध्ये करण्याचे आदेश दिले गेले आहेत.