IND VS PAK War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहे. 8 मे रोजी भारताने पाकिस्तानच्या लाहोर सह आसपासच्या ठिकाणांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात प्रसिद्ध रावळपिंडी स्टेडियम सुद्धा उद्ध्वस्त झालं. रावळपिंडी स्टेडियम गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तान सुपर लीगचा सामना होणार होता. मात्र हल्ल्यात स्टेडियम उद्ध्वस्त झाल्याने येथील सामना रद्द करण्यात आला. भारत - पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे PSL 2025 चे उर्वरित सर्व सामने दुबईत खेळवले जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतात इंडियन प्रीमियर लीग प्रमाणेच पाकिस्तानात सुद्धा PSL 2025 ही टी 20 क्रिकेट लीग खेळवली जात आहे. यंदा या स्पर्धेत एकूण 6 संघांनी सहभाग घेतला असून यात अनेक देश विदेशातील क्रिकेटर्सचा सहभाग सुद्धा आहे. PSL मध्ये आज पेशावर झालमी विरुद्ध कराची किंग्स यांच्यात सामना होणार होता. मात्र सामना होणाऱ्या स्टेडियमवर भारताने ड्रोन हल्ला केल्याने ते उद्ध्वस्त झाले. त्यामुळे हा सामना सुद्धा रद्द करण्यात आला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये झालेल्या नुकसानानंतर पाकिस्तान सुपर लीगमधून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची कमाई होत होती. त्यामुळे पाकिस्तान सुपर लीग रद्द होणं हे त्यांच्यासाठी खूप नुकसानदायक आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने हे दुबईत खेळवले जातील असे सांगितले आहे. पाकिस्तानकडून टी 20 लीगचे उर्वरित सामने हे कराची, दोहा या शहरांमध्ये खेळवण्याचा विचार केला जात होता. मात्र भारताने कराची सहित पाकिस्तानच्या अनेक महत्वाच्या शहरांवर हल्ले केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर PSL 2025 ही लीग दुबईत शिफ्ट केली आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पीसीबी सर्व क्रिकेटर्सना घेऊन दुबईसाठी उड्डाण करेल. सहा दिवसांत PSL 2025 टी 20 लीग पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे, परंतु लॉजिस्टिक व्यवस्था अंतिम झाल्यानंतर अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल.