Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'वजन नियंत्रणात ठेवणं हे मेडिकल टीमचं काम नसून...'; विनेश प्रकरणी PT Usha यांचा U-Trun?

PT Usha On Weight At Olympics: भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा म्हणून पीटी उषा कार्यरत असून त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.

'वजन नियंत्रणात ठेवणं हे मेडिकल टीमचं काम नसून...'; विनेश प्रकरणी PT Usha यांचा U-Trun?

PT Usha On Weight At Olympics: भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या (IOA) अध्यक्षा डॉ. पीटी उषा यांनी रविवारी रात्री उशिरा केलेलं एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. या वक्तव्यामध्ये पीटी उषा यांनी ऑलिम्पिकमधील 50 किलो वजनी कुस्ती गटातून अपात्र ठरलेल्या विनेश फोगाटचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांनी केलेलं विधान हे सूचक पद्धतीने विनेश फोगाटला लक्ष्य करणारं असल्याचं सांगितलं जात आहे.

नेमकं काय म्हणाल्या पीटी उषा?

माजी ऑलिम्पिकपटू आणि विद्यमान भारतीय ऑलिम्पिक महासंघ अध्यक्षा असलेल्या पीटी उषा यांनी, "वजन नियंत्रणात ठेवणं खेळाडू आणि प्रशिक्षकाची जबाबदारी असते. विशेष करुन कुस्ती, भालाफेक, बॉक्सिंग, ज्युडोसारख्या खेळांमध्ये याकडे लक्ष द्यावं लागतं. या खेळांमध्ये खेळाडूंच्या वजनाची काळजी घेणं हे प्रत्येक खेळाडू आणि त्याच्या प्रशिक्षकाची जबाबदारी असते. ही जबाबदारी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने नियुक्त केलेल्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिनशॉ पारदीवाला यांच्या टीमची नसते," असं म्हटलं आहे. 

आरोग्यविषय तज्ज्ञांची टीम का नियुक्त करण्यात आलेली?

काही महिन्यांपूर्वी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने एक टीम नियुक्त केली होती. त्यामुळे प्रामुख्याने खेळाडूंना स्पर्धेदरम्यान आणि त्यानंतर रिकव्हरीसाठी आणि दुखापतींसंदर्भातील व्यवस्थापन अधिक उत्तम पद्धतीने करता येईल अशी अपेक्षा ठेऊन टीम नियुक्त करण्यात आलेली. तसेच ज्या खेळाडूंकडे न्यूट्रिशनिस्ट आणि फिजिओथेरिपिस्टची स्वत:ची टीम नसेल त्यांनाही या टीमच्या माध्यमातून मदत केली जाईल असं सांगण्यात आलेलं. 

नक्की वाचा >> 'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिका

डॉक्टर पारदीवाला यांची पाठराखण

डॉ. पीटी उषा यांनी 'भारतीय ऑलिम्पिक महासंघाची आरोग्यविषय टीम खास करुन डॉक्टर पारदीवाला यांच्याविरोधात केली जाणारी विधानं आणि द्वेष हा स्वीकार करता येण्यासारखा नाही. याची कठोर शब्दांमध्ये निंदा केली पाहिजे,' असंही म्हटलं. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या टीमवर टीका करण्यापूर्वी सर्व माहिती टीकाकारांनी घ्यावी असं मी सूचवेल, असंही पीटी उषा यांनी म्हटलं. भारताच्या विनेश फोगाटने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मात्र सुवर्ण पदकाच्या सामन्यासाठी रिंगमध्ये उतरण्याआधीच तिला वजन अधिक असल्यानं अपात्र ठरवण्यात आलं. विनेशचं वजन 100 ग्राम अधिक भरलं. 

मोदींशी केलेली चर्चा, तेव्हा दिलेला पाठिंबा

विनेशला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीटी उषा यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्यांनी विनेशला हवी ती मदत करण्याचे निर्देश दिलेले. त्यावेळेस पीटी उषा यांनी सर्व शक्य ती मदत केली जाईल असं सांगितलं होतं. मात्र आता त्यांनी केलेलं हे विधान अधिक चर्चेत असून संभ्रमात टाकणारं आहे.

विनेशसंदर्भातील निकाल 13 ऑगस्ट रोजी

विनेशने तिच्याबरोबर घडलेल्या या प्रकरणानंतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स म्हणजेच सीएएसकडे दाद मागितली आहे. तिने आपल्याला कांस्यपदक दिलं जावं अशी मागणी केली आहे. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असून यासंदर्भातील निकाल 13 ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे. 

Read More