Rahul Dravid : आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये आरसीबीने पंजाब किंग्सला पराभूत करून पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरसीबीचा विजयोत्सव साजरा करताना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झाली. यानंतर पोलिसांकडून या घटनेची चौकशी केली जात असून आरसीबीच्या मार्केटिंग हेड सह अनेकांवर फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला आहे. भारताचे माजी कर्णधार आणि हेड कोच राहुल द्रविडने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल द्रविडने वर्ल्ड कप 2024 च्या विजयानंतर टीम इंडियाच्या हेड कोच पदावरून बाजूला झाला. तो सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा हेड कोच म्हणून काम पाहत आहे. राहुल द्रविडने बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर बोलताना म्हटले की, 'बंगळुरू हे क्रीडाप्रेमी शहर आहे. मी सुद्धा याच शहरातून येतो आणि इथे लोकं फक्त क्रिकेटचं नाही तर प्रत्येक खेळाला पसंत करतात आणि त्या त्या संघाला फॉलो करतात. मग तो फुटबॉलचा संघ असो वा कबड्डीचा संघ'.
हेही वाचा : IPL 2025 जिंकताच RCB विकायला काढली? कोण आहेत मालक? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
बंगळुरू चेंगराचेंगरीत 11 लोकांच्या मृत्यूबाबत बोलताना राहुल द्रविड म्हणाला की, 'आरसीबी फॅन्सची संख्या खूप मोठी आहे. ही घटना खरोखरच खूप दुःखद आणि दुर्भाग्यपूर्ण आहे. घटनेत मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांच्या कुटुंबांप्रती आमच्या संवेदना आहेत'. या घटनेनंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघ सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ईएस जयराम यांनी घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला आहे.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीचा मार्केटिंग प्रमुख निखिल सोसले याला 6 जून रोजी अटक करण्यात आली होती. दुसरीकडे अशी बातमी समोर येतेय की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मालक फ्रेंचायझी विकण्याच्या तयारीत आहेत. त्याची किंमत सुमारे 17 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.