Rajasthan High Court Rejects Interim Bail Plea of Yash Dayal: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज यश दयालवर बलात्काराचे गंभीर आरोप झाले असून त्याच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने यश दयालला झटका दिला आहे. कथित बलात्कार प्रकरणी त्याच्या अटकेवर स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
जयपूरमध्ये या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सुदेश बंसल यांनी नमूद केलं की पीडित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीला कोणतीही तात्पुरती सूट देता येणार नाही. न्यायालयाने पोलीस केस डायरी मागवली असून पुढील सुनावणीसाठी २२ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे.
यश दयालचे वकील कुणाल जैमन यांनी कोर्टात सांगितले की हे प्रकरण एका नियोजित षड्यंत्राचा भाग आहे. त्यांनी दावा केला की यापूर्वी गाझियाबादमध्येही अशाच स्वरूपाचा बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता, ज्यावर इलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. वकिलांनी यश दयालविरोधात पुन्हा एफआयआर दाखल केल्याच्या वेळेवरही प्रश्न उपस्थित केला. "पहिल्या घटनेनंतर केवळ सात दिवसांत जयपूरमध्ये दुसरी एफआयआर नोंदवण्यात आली, हे दर्शवतं की ब्लॅकमेलिंगसाठी एखादं रॅकेट काम करत असावं. " असं त्यांनी सांगितलं.
जयपूरच्या सांगानेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल जैमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका क्रिकेट कार्यक्रमादरम्यान यश दयालच्या संपर्कात आली होती. तिच्या आरोपानुसार, दोन वर्षांपूर्वी करिअरमध्ये मदतीचं आमिष दाखवत यश दयालने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. पोलिसांच्या मते, 2025 च्या IPL हंगामादरम्यान जयपूरच्या सीतापुरा भागातील एका हॉटेलमध्ये पुन्हा तिच्यासोबत बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात पीडित मुलगी 17 वर्षांची असल्याने ‘पॉक्सो कायदा’ आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, दयालने दोन वर्षांपूर्वी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर जातीयवादी मजकूर पोस्ट केल्याचा दावा करून गोंधळ निर्माण केला होता. नंतर त्याने स्पष्ट केले की त्याच्या अकाउंटवरून दोन वादग्रस्त अहवाल पोस्ट करण्यात आले होते, परंतु त्याने ते पोस्ट केले नव्हते.